झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातही आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राळेगणमधील महिला हे अण्णा हजारे यांना वडीलच नाही भाऊ देखील मानत असल्यामुळे त्यांनीआज अण्णांना ओवाळून भाऊबीज साजरी केली.
दरम्यान, टीम अण्णांची उद्या गाझियाबादमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत दिग्विजयसिंगांनी टीम अण्णांवर केलेल्या आरोपांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतयं. शिवाय जनलोकपालच्या आंदोलनाची पुढची रणनितीही या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. रक्तदाब वाढल्यानं अण्णा मात्र या बैठकीला हजर राहणार नाहीत.त्यांना मणक्याचाही त्रास होऊ लागलाय. बैठकीतील चर्चेबाबत मात्र अण्णांना माहिती देण्यात येणार आहे.
लोकपाल विधेयकासाठी सरकारनं हालचाली सुरु केल्यात. मतैक्य साधण्यासाठी संसदेची स्थायी समिती तीन आणि चार नोव्हेंबरला टीम अण्णांशी चर्चा करणार आहे. या प्रकरणी अण्णांनी उपोषण करून सरकारला हादरवून सोडलं होतं. त्यानंतर सरकारनं याबाबत आश्वासन देऊन अण्णांना उपोषण सोडायला लावलं. विधेयकाच्या मसुद्याबाबत स्थायी समिती टीम अण्णांशी चर्चा करणार आहे.