दादा, इथं काय कारवाई करणार?

‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला तंतोतंत लागू पडतेय. बेकायदा बांधकामावर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेचीच इमारतच बेकायदा असल्याचं समोर आलंय.

Updated: Jul 11, 2012, 01:26 PM IST

www.24taas.com, पिंपरी चिंचवड

 

‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला तंतोतंत लागू पडतेय.  बेकायदा बांधकामावर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेचीच इमारतच बेकायदा असल्याचं समोर आलंय.

 

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेनं गेले काही दिवस अनधिकृत इमारतींवर बुलडोजर फिरवायला सुरुवात केलीय. पण, धक्कादायक गोष्ट म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेची इमारतच बेकायदेशीपरणे बांधल्याचं समोर आलंय. महापालिकेची इमारत तब्बल १४ हजार २७६.७३ स्क्वेअर फूट आहे. पण प्रत्यक्षात या इमारतीतल्या फक्त २६३४. ६९ स्क्वेअर फूट बांधकामालाच परवानगी देण्यात आलीय. विशेष म्हणजे पालिकेनंच माहिती अधिकारांतर्गत शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांना ही माहिती दिलीय. एवढंच नाही तर महापालिकेची विविध प्रभागात असलेली कार्यालय, व्यापारी संकूलही बेकायदा असल्याच समोर आलंय.

 

दुसरीकडे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामाबद्दल माहिती नसल्याचं आयुक्तांनीच म्हटलंय. तर माहिती घेऊन कारवाई करु, असं थातूरमातूर उत्तर अधिकाऱ्यांनी दिलंय. पुण्यात एक हाती सत्ता नसल्यामुळं अतिक्रमण विरोधी कारवाई करू शकत नाही पण पिंपरीत मात्र करू शकतो, असं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलंय. आता एक हाती सत्ता असलेल्या या शहरात पालिकेच्याच अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचा आदेश दादा देणार का? असा प्रश्न इथल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय.