पुण्यातही दुष्काळ, पाण्यासाठी लोकांचे हाल

प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातही पाणीटंचाईचं वास्तव भीषण आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती असून लाखो लोक पाण्यासाठी तहानलेले आहेत. हा दुष्काळ नैसर्गिक आहे की मानवनिर्मित यावर वाद झडू शकतो.

Updated: Apr 12, 2012, 08:24 AM IST

www.24taas.com, पुणे

 

प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातही पाणीटंचाईचं वास्तव भीषण आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती असून लाखो लोक पाण्यासाठी तहानलेले आहेत. हा दुष्काळ नैसर्गिक आहे की मानवनिर्मित यावर वाद झडू शकतो.

 

रणरणतं ऊन, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा, पाण्यावाचून भेगा पडलेल्या जमिनी, उन्हामुळं शुष्क पिवळेधम्म पडलेले डोंगर, खोल गेलेल्या विहिरी, जीवाची काहिली थांबवण्यासाठी पाणी शोधत फिरणारी जनावरं, भरदुपारी डोक्यावर हंड्यांची उतरंड घेऊन ये-जा करणारी बाया-माणसं हे सगळं पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला राजगुरुनगर तालुक्यातलं हे उन्हाळ्यातलं दृश्य आहे.  भरदुपारी ग्रामस्थांच्या पाण्याची शोधयात्रा एका डोंगरकपारीत झऱ्याकाठी संपते आणि या झ-यात हंडाभर पाणी मिळवण्यासाठीही तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

सुपेवाडी, भोतेवाडी, भीकारवाडी, निर्मळवाडी अशा कितीतरी वाड्या-वस्त्यांची ही परवड वर्षानुवर्षे आहे तशीच आहे. राजगुरुनगरसोबतच पुरंदर, इंदापूर, दौंड आणि बारामतीतल्या काही गावातही हीच परिस्थिती आहे. काही भागात टँकरनं पाणीपुरवठा सुरु आहे. एकूण २१ टँकरपैकी बारामतीत १५, इंदापूर आणि पुरंदरसाठी प्रत्येकी एक तर दौंड तालुक्यात ४ टँकरनं पाणीपुरवठा होतोय.  मात्र तासन तास वाट पाहून एक हंडा पाणी पदरात पडतंय. टँकरमधून प्रतिमाणशी २० लिटर पाणी कशा-कशाला पुरवायचं असा प्रश्न विचारण्यात येतोय.

 

गेल्यावर्षीपेक्षा ही परिस्थिती यावर्षी लवकर उद्भवलीय. टँकरची गरज आणखी मोठी आहे. मात्र केवळ टँकरमुक्ती घोषणेचा बोजवारा उडू नये म्हणून टँकर योजनेपासून हजारो लोक वंचित आहेत. दूर कुठेतरी दुथडी भरुन वाहणारी नदी दिसतेही मात्र त्याचा उपयोग होत नाही. अनेक ठिकाणी बागायती सोडाच, जिरायतीही धड होत नाही.

 

जिल्ह्याचं नेतृत्व राज्यात करणारे अनेक रथी-महारथी आहेत. प्रगत जिल्हा म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात ते मग्न आहेत. जिल्ह्यातला हा पाण्याचा असमतोल दूर करण्यात मात्र ही मंडळी पूर्ण अपयशी ठरली आहेत आणि ही पाणीटंचाईची मानवनिर्मित जखम कपाळावर घेऊन अनेक वाड्या वस्त्यातल्या अबालवृद्धांचा हा अश्वत्थाम्याचा संघर्ष सुरुच आहे.