पेपरफुटीचं लोण राज्यात

पेपरफुटीप्रकरणाचं लोण आता मुंबईतून राज्यात पसरलंय. आज सकाळी औरंगाबादमध्ये इंजिनिअरींगचा पेपर फुटलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दुसऱ्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला.

Updated: May 23, 2012, 12:56 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद / नागपूर

 

पेपरफुटीप्रकरणाचं लोण आता मुंबईतून राज्यात पसरलंय. आज सकाळी औरंगाबादमध्ये इंजिनिअरींगचा पेपर फुटलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दुसऱ्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला. आज दुपारी १२ वाजता या विषयाची परीक्षा होणार होती. मात्र हा पेपर सकाळीच विद्यार्थ्यांच्या हाती लागला. दरम्यान, पेपरफुटीच्या प्रकरणानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालं. विद्यापीठानं आजचा गणिताचा पेपर रद्द केला. या पेपरची पुढील तारीख विद्यापीठाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी सांगितलंय.

 

नागपूरमध्येही विद्यापीठाचं पेपरफुटीचं प्रकरण ताजं असतानाच, आता टंक लेखन परीक्षेचेही पेपर फुटल्याचं उघड झालंय. मंगळवारी, या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आलं होतं. पेपरफुटीच्या या गैरप्रकारात शासकीय अधिकारी आणि राजकीय टंकलेखन संस्थेचे संचालक गुंतले असल्याचा आरोप होतोय. याची दखल घेत २२ ते २५ मे दरम्यानची टंकलेखन परीक्षा रद्द करण्यात आलीय. याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. शिवाय चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष एच.ए. शिंदे यांनी दिलीय.  एकट्या नागपूरमध्ये टंकलेखनासाठी ३४ हजार विद्यार्थी बसले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी नोकरीकरता टंकलेखकाची आवश्यकता असते. यावर्षी राज्यभरातून २ लाख ७० हजार परिक्षार्थी ही परीक्षा देतायेत. शिक्षण विभागाच्या विभागीय उपसंचालकांच्या माध्यमातून ही टंकलेखनाची परीक्षा घेतली जाते.