महाराष्ट्रात बंदला हिंसक वळण

पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागलाय. पाहुयात आज सकाळपासून कुठे कुठे काय काय घडलं... भारत बंदला कसा मिळाला महाराष्ट्रात प्रतिसाद...

Updated: May 31, 2012, 02:56 PM IST

 

  www.24taas.com

 

 

पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागला. आत्तापर्यंत जवळजवळ 1722 सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. पाहुयात आज सकाळपासून कुठे कुठे काय काय घडलं... भारत बंदला कसा मिळाला महाराष्ट्रात प्रतिसाद...

 

 

 नाशिक

बंदवर खाकीचं सावट - एनडीएने पुकारलेल्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शहरातील मुख्य बाजारपेठ बंद असून एमजीरोड परिसरातील दुकाने बंद आहेत. चाकरमान्यांची कामे मात्र सुरळीतपणे सुरु आहेत. रोजची वाहातूक आणि सिटी बसेस सुरळीतपणे सुरु आहेत. भाजपा आणि माकप कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सर्वकाही सुरळीत ठेवले आहे. यामध्ये भाजपाचे गिरीश महाजनांसह काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे नेहमीच बसेसच्या काचा फुटणा-या नाशिकमध्ये एकाही बसवर दगडफेक झालेली नाही पोलिसांच्या खाकीचं सावट आजच्या बंदवर दिसून आलं. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सारंगल यांच्या कारवाईच्या भीतीयुक्त दहशतीने नाशिकचा बंद समिश्र मात्र शांततेत होतो आहे.

 

 

नागपूर 

स्टार बससेवा बंद -  नागपूरमध्ये स्टार बससेवा बंद करण्यात आलीय. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासून ११७ बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५ बसेस फोडण्यात आल्या. त्यामुळं स्टार बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काल रात्रीही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी १० बसेसची तोडफोड केली. नागपूर बस स्थानक आणि वैद्यनाथ चौकात ही घटना घडली. त्यामुळं रात्री उशिरापर्यंत तणाव होता. विरोधी पक्षांनी बंद यशस्वी करण्यासाठी कंबर कसलीये. कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहता आजच्या बंदला हिंसक वळण लागल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये भारत बंदच्या पार्श्वभूमीवर 5 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.

 

 

 कोल्हापूर

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शहरात कमी - अधिक प्रमाणात दुकानं उघडी असल्याचं चित्र आहे. मात्र रस्त्यांवर नेहमीच्या तुलनेत वर्दळ कमी आहे. शिवसेना, भाजप आणि आरपीआयनं शहरातून रॅली काढून व्यापा-यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं.