www.24taas.com, नवी मुंबई
पुण्यातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचं अपहरण करुन त्याला नवी मुंबईत आणून लुटण्यात आलं. इतकचं नाही तर त्याला वाशीच्या खाडी पुलावरुन खाली फेकण्यात आलं. मात्र नशीब बलवत्तर असलेल्या या विद्यार्थ्याला मच्छिमारांनी वाचवलं.
निखील नरेद्र गटाघट हा मूळचा लातूरचा राहणारा. तो पुण्यातल्या शिवाजीनगर येथील ई.टी.सी इंजिनीअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकतोय. शनिवारी सकाळी तो पुण्यातील स्वारगेट स्थानकावर उतरला. शिवाजीनगर येथे जाण्यासाठी त्याने रिक्षा पकडली. त्यावेळी सहप्रवाशानं निखीलला चाकूचा धाक दाखवत नाकाला गुंगीचा रुमाल लावून त्याला बेशुद्ध केलं. निखिलला जाग आली
तेव्हा तो एका खाजगी गाडीत होता. कॉलेजची फी भरण्यासाठी आणलेले ६० हजार रुपये, मोबाईल, घड्याळ आणि दोन बॅगा लुटून त्याला वाशीच्या खाडी पुलावरून खाली फेकले. खाली पडल्यावर काही काळ पाण्यात पुलाच्या रेलींगला धरुन होता. त्यानंतर वाशी गावातल्या मच्छिमारांच्या तो नजरेस पडल्यानं मच्छिमारांनी त्याला वाचवले.
या प्रकरणी पोलिसांनी त्याचा जबाब नोदवून अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न आणि चोरीचा गुन्हा दाखल केलाय. केवळ नशिबाची दोरी घट्ट असल्यानं निखीलचा जीव वाचला आहे. परंतु पैशासाठी कोणत्याही थराला जाणा-या अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आलीय.