www.24taas.com, कॅलिफोर्नया
काही अब्ज वर्षांपूर्वी धूमकेतू वा हिमपिंडांनी पृथ्वीवर जीवोत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण केलं असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांच्या मते अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर धडकलेल्या धूमकेतूमुळे या ग्रहावर जीवोत्पत्तीसाठी आवश्यक असणारी तत्वं पसरवली. त्यातूनच आजचं सजीवांनी भरलेलं जीवन बहरून आलं. जीवसृष्टीची संपूर्ण उलाढाल या धूमकेतूच्या आपटण्यातून झालेली आहे.
यासंबंधी शोधकार्य करत असणाऱ्या संघटनेच्या प्रमुख जेनिफर जी ब्लँक यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या शक्तिशाली बंदूका आणि काँप्युटर मॉडेल्सच्या मदतीने या प्रक्रियेचा अभ्यास केला गेला. जेव्हा धूमकेतुंनी पृथ्वीतलावरील वातावरणाला २५,००० मैल प्रति सेकंदच्या वेगाने येऊन धडक दिली, तेव्हा धूमकेतूमधील काही तत्वं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरली.
ब्लँक म्हणाल्या आमच्या शोधातून हे लक्षात येतंय की जीवसृष्टी निर्माण करणारं वातावरण त्यानंतरच्या विविध परिस्थितींमध्येही टिकून राहिलं. जीवसृष्टीतील रहस्य शोधण्याचं काम बऱ्याच काळापासून चालू आहे. यात धूमकेतूच्या आपटण्याने जीवोत्पत्ती निर्माण झाली असावी, असा दावा करणारा एक सिद्धांत आहे. या शोधातून अशा सिद्धांताला पुष्टी मिळत आहे.