गौरवच्या पंखांना हवं आर्थिक बळ

औरंगाबादच्या एका रिक्षा चालकाच्या मुलाने असामान्य कामगिरी केली आहे. बल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी गौरवची निवड झाली आहे. मात्र गौरवला ही उत्तुंग भरारी घेण्यासाठी गरज आहे ती आर्थिक मदतीची.

Updated: Feb 21, 2012, 08:09 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

औरंगाबादच्या एका रिक्षा चालकाच्या मुलाने असामान्य कामगिरी केली आहे. बल्गेरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी गौरवची निवड झाली आहे. मात्र गौरवला ही उत्तुंग भरारी घेण्यासाठी गरज आहे ती आर्थिक मदतीची.

 

राष्ट्रीय पातळीवर जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या औरंगाबादच्या गौरव जोगदंडकडे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी चालून आली आहे. बल्गेरियात होणाऱ्या बाराव्या आंतरराष्ट्रीय ऍरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी गौरवची निवड झाली. मात्र पैशांअभावी गौरवला ही संधी हुलकावणी देते की काय अशी परिस्थिती आहे. या दौऱ्यासाठी गौरवला ८० हजार रुपये लागणार आहेत. त्याला प्रायोजकत्व मिळावे यासाठी त्याच्या पालकांची धडपडही सुरू आहे.

 

गौरवचे वडिल अविनाश जोगदंड हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपण गरिब असलो तरी आपल्या मुलाने मोठे जिम्नॅस्टिकपटू व्हावे आणि देशाचे नाव उंचवावे अशी त्याच्या पालकांची इच्छा आहे. गौरवनंही राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिलंय. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाकरता मेडल मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग त्यानं बांधला आहे.

 

आता गौरवच्या पंखांना आर्थिक बळ देण्यासाठी गरज आहे. आता गौरवचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि औरंगाबादचे नाव जागतिक पटलावर मोठं करण्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी एकत्र येऊन गौरवला मदतीचा हात देण्याची गरज आहे.