कॅप्टन्सची अग्नीपरीक्षा!

भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज दरम्यान खरी अग्निपरीक्षा असणार आहे ती दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनी प्रथमच कॅप्टन्सी सांभाळत आहे. तर मायकल क्लार्कही प्रथमच टीम इंडियाविरूद्ध कॅप्टन्सीची धूरा वाहत आहे.

Updated: Dec 24, 2011, 09:58 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

 भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज दरम्यान खरी अग्निपरीक्षा असणार आहे ती दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनी प्रथमच कॅप्टन्सी सांभाळत आहे. तर मायकल क्लार्कही प्रथमच टीम इंडियाविरूद्ध कॅप्टन्सीची धूरा वाहत आहे. आता या दोन कॅप्टन्समध्ये कोण बाजी मारतं याकडे क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलं आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. टेस्ट आणि वन-डेमध्येही त्याने अव्वल स्थानाची चवही चाखायला दिली. मात्र कॅप्टन माहीची खरी अग्निपरीक्षा असणार आहे ती ऑस्ट्रेलियात. क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठीत आणि खडतर दौरा असं ज्याचं वर्णन केल जात त्या ऑस्ट्रेलियात धोनी प्रथमच कॅप्टन्सी करणार आहे. आता कांगारूंना त्यांच्याच भूमीत पराभूत करून इतिहास रचून आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवण्याची संधी धोनीला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन माइकल क्लार्कच्या कॅप्टन्सीचादेखील कस लागणार आहे. ऑस्ट्रेलियाची सध्याची खराब कामगिरी पाहता कॅप्टन क्लार्कला टीम इंडियाला नामोहरम करणं सोपं नसेल. एकूणच दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सची या सीरीजमध्ये खरी परीक्षा असणार आहे.

 

धोनीने आतापर्यंत खेळलेल्या ६४ टेस्टपैकी ३४ टेस्टमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची धुरा सांभाळली आहे. यामध्ये त्याने १७ टेस्टमध्ये भारताला विजय मिळवून दिला तर ७ वेळा त्याला पराभवाला सामोर जाव लागल. उर्वरित १० टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. तर क्लार्कने आतापर्यंत ८च टेस्टमध्ये कॅप्टन्सी सांभाळली असून त्याने ऑस्ट्रेलियाला ३ वेळा विजय तर ३ वेळा पराभव स्वीकारायला लावलाय. तर २ वेळा टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. धोनीने कॅप्टन्स असताना ३४ टेस्टमध्ये ४३.१५ च्या सरासरीने १ हजार ९८५ रन्स केल्या असून त्यामध्ये ४ सेंच्युरी आणि १४ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर दुसरीकडे क्लार्कने कॅप्टन्सी सांभाळताना ८ टेस्टमध्ये ४१.८५ च्या सरासरीने ५८६ रन्स केल्या असून त्यामध्ये ३ सेंच्युरी आणि १ हाफ सेंच्यरीचा समावेश आहे.

 

आता या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारत याकडेच तमाम क्रिकेट फॅन्सच लक्ष लागून राहिलं आहे. पाहुण्या टीम इंडियाला आपल्या भूमीत जिंकू न देण्यासाठी क्लार्कने जिगरबाज खेळ करावा अशी इच्छा तमाम ऑस्ट्रेलियन्स फॅन्स बाळगून असतील. तर दुसरीकडे धोनीने कांगारूंना त्यांच्याच भूमीत चित करून इतिहास रचावा अशी आशा तमाम भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत.