www.24taas.com,चेन्नई
महेंद्रसिंग धोनीच्या सुपर किंग्जने दादा गांगुलीच्या पुणे वॉरियर्सला 13 रन्सनी पराभूत केले. धोनीच्या शिलेदारांनी जोरदार फटकेबाजी करताना १६४ रन्स केल्या. मात्र, पुणे वॉरियर्सला हे आव्हान पेलले नाही. वॉरियर्सचे खेळाडूंनी बेजबाबदार बॅटींग केल्याने पहिले तीन गडी झटपट तंबूत परतले. पुण्याची टीम १५१ रन्समध्ये गुंडाळली गेली.
पुणे वॉरियर्सचा सलामीला आलेला उथप्पा (८) , जेसी रायडर (९) या जोडीने एकेरी धावांवर नांगी टाकली. यामुळे गांगुलीने कंबर कसली. त्याने फटकेबाजी करत विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याला पांडेने मोलाची साथ दिली. यामध्ये पांडेने 6 चेंडंत 1 षटकार ठोकून 13 धावा काढल्या. मात्र, ब्राव्होने त्याला झेलबाद करून तंबूत पाठवले. ४ बाद ६४ रन्स असताना पुण्याला जकातीने जबर धक्का दिला. त्याने गांगुलीला (२४) झेलबाद करून संघाच्या विजयातला मोठा अडसर दूर केला.
घरच्या मैदानावर डुप्लेसिस (५८) व बद्रीनाथ (५७) या जोडीने चेन्नईला दमदार सुरुवात करून दिली. पुण्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत या जोडीने धडाकेबाज शतकी भागीदारी केली. या जोडीच्या तुफानी वादळाला रोखण्यासाठी पुण्याच्या गोलंदाजांना मोठी कसरत करावी लागली. चौफेर फटकेबाजी करणा-या या जोडीने १२ चौकार , २ षटकार ठोकले. अखेर सॅम्युल्सला यश गवसले. त्याने फटका मारण्याच्या मोहात पाडून दोघांनाही झेलबाद केले. त्यानंतर सुरेश रैनाला (०) नेहराने आल्यापावलीच तंबूत पाठवले. अखेर कर्णधार धोनीने पुढाकार घेतला. मात्र, त्याला साथ देणा-या ब्राव्होला (१२) नेहराने झेलबाद केले. या जोडीने तुफानी खेळी करत संघाच्या धावसंख्येला बळकटी आणली. यांच्या जोरावर १६४ रन्स धोनीच्या संघाने उभारल्या.