www.24taas.com, मुंबई
सचिनने निवृत्ती का पत्करावी हा सवाल आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा...सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी शंभरावे शतक झळकावल्यामुळे लता मंगेशकरांना आनंद झाला आहे. पण त्याचबरोबर सचिनने आता निवृत्त व्हावं असं सूचवलं जात असल्यामुळे त्या नाराजही आहेत.
आपण आपल्या सर्वोत्कृष्ट कलाकार आणि खेळाडूंबाबतीत असं का वागवतो असा लता मंगेशकरांचा संतप्त सवाल आहे. आपण त्यांच्यावर कामगिरीसाठी एवढं दडपण का आणतो? लोकांना खूपदा वाटतं कि हे सगळं सहजसोपं असतं पण मी स्वत: कारकिर्दीतल्या चढउतारांचा अनूभव घेतला आहे. माझ्या जीवनात एक वेळ अशी होती कि मी संगीत क्षेत्र सोडण्याच्या तयारीत होते. पण मी संघर्ष केला आणि त्यावर मात केली. तसाच सचिननेही केला असल्याचं लता मंगेशकर सांगितलं.
सचिनने १०० शतकाचा टप्पा गाठावा यासाठी त्याच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाबाबतीत त्यांनी स्पष्ट शब्दात नापसंती दर्शवली आहे. आपण आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास त्यांच्यावर दडपण टाकून हिरावून घेतो हे दु:खदायक असल्याचंही मत त्यांनी नोंदवलं. सुदैवाने सचिनने दडपण येऊन दिलं नाही आणि त्याचं खेळावर मनापासून प्रेम असल्याने तो खेळत राहिला. मी सुद्धा गाणं गात राहिले ते कसं होईल याचा विचार न करता.
सचिनला शारजाह इथे पहिल्यांदा खेळताना पाहिल्याच्या आठवणींना उजाळाही लता मंगेशकरांनी दिला. त्यावेळेस वादळाने खेळ थांबवला होता पण त्यावेळेस सचिनने पॅड बांधून खेळ सुरु होण्याची प्रतिक्षा केली. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास त्याच्यातला मी पाहिला आणि त्याविषयी मला कौतूक आहे. लता मंगेशकरांना पूर्वीपासूनच क्रिकेटची आवड राहिली आहे आणि जून्या जमानातल्या खेळाडूंशी त्यांचे घरोब्याचे संबंध राहिले आहेत.