मालेगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' या घोषणेची त्यांनी खिल्ली उडविली. मात्र, यावेळी टीका करायच्या नादात चव्हाण यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव य़ेथे काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, नरेंद्र-देवेंद्र जोडी म्हणजे 'बाप तसा बेटा' आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगितली. गावातील शाळेत दुपारची सुटी झाली होती. मुले आणि मास्तर झाडाच्या सावलीत जेवत होते. यावेळी एक विद्यार्थी मास्तरांच्या टेबलवर उभा राहून लघवी करत होता. मास्तरांनी हे कृत्य त्याच्या वडिलांना सांगण्याचे ठरविले आणि गावात गेले. यावेळी या विद्यार्थ्याच्या वडिलांनी यात नवल काय, मी छतावर उभा राहून लघवी करत असल्याचे मास्तरला सांगितले. अशीच स्थिती आज देशात आणि राज्यात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.