जळगांव : आजपर्यंत व्यापारी शेतकऱ्यांचे शोषण करतात असे ऐकिवात येत होते. बहुतांश वेळा असं होतं की, व्यापारी शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मालाचा योग्य भाव मिळू देत नाही
परंतु शेतकऱ्याने ताठ मानेने व्यापाऱ्याला आपल्या शेतमालाला सर्वोत्तम भाव देण्यास भाग पडले तर, तो दिवस शेतकऱ्यांसाठी सुखावणारा ठरेल. अशीच स्थिती सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झाली तर, नक्कीच बळीराजाला सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. असंच काहीसं घडलंय जळगावच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत. पाहूयात
गेल्या काही दिवसांपासून डफ वाजवून कापसाची उच्च भावात लिलाव करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एरव्ही शेतकऱ्यांच्या कपाशीला साधारण 5500 ते 6 हजार प्रतिक्विंटल भाव मागणारे व्यापारी आता 10 हजार रुपयांपर्यंत भाव देण्यास तयार झाले आहे. कपाशीला कधी नव्हे तो दमदार भाव बाजारात मिळत आहे.
अनेकदा व्यापाऱ्यांच्या मागे लागून, हातापाया पडून शेतमालासाठी भाव मिळवला जातो. परंतु व्यापारी शेतकऱ्याच्या मागे लागून शेतमाल देण्यासाठी विनवणी करीत असल्याचे जळगावात घडले आहे. व्यापारी शेतकऱ्याला 9 हजार 900 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव देण्यास तयार आहे, तरी शेतकरी व्यापाऱ्याला कपाशीची विक्री करण्यास तयार नाही. अहिराणी भाषेतून शेतकरी आणि व्यापाऱ्यातील डिल चर्चेचा विषय ठरत आहे.
जळगाव आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. बोंड अळी आणि अनेक रोगांमुळे कापसाचे उत्पादनही कमी झाले. परिणामी असलेल्या कापसाला सोन्यासारखा भाव आला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी बाजारात आपला दमदार डंका वाजवत आहेत. नक्कीच ही बाब सुखावणारी आहेच