'मोदी तो गयो! वाराणसीत विजयासाठी झगडावं लागेल, हा त्यांचा..'; उमेदवारी अर्जावरुन राऊतांचा टोला

Modi Files Nomination From Varanasi Sanjay Raut Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 साली वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती. आता त्यांनी तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 14, 2024, 01:48 PM IST
'मोदी तो गयो! वाराणसीत विजयासाठी झगडावं लागेल, हा त्यांचा..'; उमेदवारी अर्जावरुन राऊतांचा टोला title=
राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मोदींवर साधला निशाणा

Modi Files Nomination From Varanasi Sanjay Raut Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. वाराणसीमधून पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. या ठिकाणी 1 मे रोजी मतदान होणार आहे. आज सकाळी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मोदी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले. त्याच्याबरोबर भाजपाचे नेतेही उपस्थित होते. मात्र मोदींनी अर्ज दाखल केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी अर्ज भरण्याआधी काढलेली यात्रा हा त्यांचा निरोप समारंभ असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. 

हा मोदींचा निरोप समारंभ

नाशिकमध्ये आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. नाशिकमधील काही बिल्डर्सच्या फायद्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून 2020 ते 2022 दरम्यान 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. यासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचं गंभीर आरोप राऊत यांनी केला. सदर प्रकरणी आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कारवाई करावी अशी मागणी केल्याचंही राऊत यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये मोदी आज उमेदवारी अर्ज भरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "हा त्यांचा निरोप समारंभ आहे आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा अशी लोक उपस्थित राहतात. त्यांचीही निरोपाची यात्रा आहे. त्या यात्रेत त्यांची लोकं उपस्थित राहणार. हे त्यांचे फेअरवेल आहे. फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी असला तर राजकीय दृष्ट्या चांगला मोक्ष मिळतो," असा टोला त्यांनी लगावला.

वाराणसीमधूनही विजयासाठी झगाडवं लागेल

पुढे बोलताना मोदींना वाराणीसमध्येही विजयासाठी झगडावं लागेल असं राऊत म्हणाले. "आम्ही वारंवार सांगतो आहोत, मोदी तो गयो! मोदींना वाराणसीमध्ये सुद्धा विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती आहे," असं राऊत म्हणाले. तसेच राऊत यांनी, "मोदींचं दैवत व संतत्व संपलेलं आहे. यापुढे नरेंद्र मोदी अध्याय देशाच्या राजकारणातून संपलेला असेल. मोठं बहुमत काय तर साधं बहुमत जरी मिळालं तरी पुरे झालं," असाही टोला लगावला. "भाजप 200 च्या वरच जात नाही. त्यांच्या मित्र पक्षांना गृहित धरुन सुद्धा त्यांची गाडी 200 वर अडकेल," असं राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदी 2014 मध्ये 3 लाखांहून अधिक मतांनी वाराणसीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवताना जिंकले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 4 लाखांहून अधिकची आघाडी घेत विजय मिळवलेला.