पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी आज आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता.
यावेळी त्यांनी काकांवर (शरद पवार) गुन्हा दाखल झाल्याने आपण अस्वस्थ झाल्याचे म्हटले. सध्याच्या राजकारणाची पातळी अत्यंत खालावली आहे. त्यामुळे आपण यामधून बाहेर पडलेले बरे, त्याऐवजी आपण शेती किंवा उद्योग करू, असे अजित पवार यांनी आपल्या मुलाला म्हटले.
मी इतकी वर्षे सहकारी संस्थांमध्ये काळजीपूर्वक काम केले आहे. त्यामुळे मला चौकशीची चिंता नाही. मात्र, तब्बल ५० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात काम केलेल्या काकांना (शरद पवार) त्यांचा कोणताही सहभाग नसतानाही राज्य सहकारी बँकेच्या चौकशीत गोवण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही गोष्ट मला सहन होत नाही. त्यामुळे आपण या राजकारणातून बाहेर पडलेले बरे, असे उद्विग्न उद्गार अजित पवारांच्या तोंडातून बाहेर पडल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती. मला पुण्यातील दौऱ्यावरून परतत असताना हा प्रकार समजला. त्यामुळे आता मी अजित पवार यांच्याशी चर्चा करेल, असे शरद पवार यांनी सांगितले.