पुणे: शिवसेना- भाजपने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समेट केला असला तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हा बदल स्वीकारायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. आता ईशान्य मुंबईपाठोपाठ मावळ मतदारसंघातही असा प्रकार घडलाय. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना - भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे युतीचे उमेदवार आहेत. मात्र, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप बारणेंसाठी काम करण्यास नकार दिला आहे.
जगताप यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वतः मध्यस्थी करत श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप ह्यांच्यात सोबत एक बैठक घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल दीड तास ही बैठक चालली. मात्र, बैठकीदरम्यान आमदार जगताप यांनी काढता पाय घेतला आणि कुठलीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रसंगानंतर संपूर्ण शहरात उलटसुलुट चर्चेला उधाण आले आहे. परंतु, बारणे यांनी भाजपा नेते दोन दिवसांत प्रचारात असतील, असा विश्वास व्यक्त केला.
ईशान्य मुंबईत हीच परिस्थिती उलटी आहे. किरीट सोमय्या यांनी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव टोकाला पोहोचला होता. आता युती झाल्यानंतर भाजपकडून विद्यमान खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास सुनिल राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा इशारा स्थानिक शिवसैनिकांनी दिला आहे.