अरुण मेहेत्रे, झी २४तास, पुणे : आयुष्याच्या एका वळणावर स्वत:चं घर असावं अशी अनेकांचीच इच्छा असते. किंबहुना हे त्यांचं स्वप्नच असतं. तेच स्वप्न उराशी बाळगून पुण्यात अनेकांनी विश्वविहार या गृह प्रकल्पात घरांचं बुकिंग केलं. मात्र आज बुकिंग करून ५ वर्षे उलटली तरीही त्यांना त्यांच्या घराचा ताबा काही मिळालेला नाही.
बांधकाम अर्धवट, विकसक गजाआड आणि खोलीधारक वाऱ्यावर अशी चिंताजनक अवस्था आज पुण्यात पाहायला मिळत आहे. पुण्याच्या आंबेगाव परिसरातील विश्वविहार या गृह प्रकल्पात घर बुक केलेल्या शेकडो नागरिकांवर आज ही वेळ ओढवली आहे.
एकिकडे घराचा ताबा न मिळालेल्यांची समस्या आहे, तर दुसरीकडे ज्यांना ताबा मिळाला आहे ते इतर अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. प्रकल्पाच्या ३ इमारतींपैकी दोनच इमारती बांधून झाल्यात. तर उर्वरित एका इमारतीचा काही थांगपत्ताच नाही. अनेकांनी कर्ज काढून घरासाठीचे पैसे फेडले. मात्र आज त्यांच्यावरच आता विकसकाविरोधात भांडण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही विकसकानं गंडा घातला आहे. अशा अनेक स्वरूपाच्या तक्रारी आल्यांनतर विजय तापडिया या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली.
पुण्यातील ही एकंदर परिस्थिती पाहता पुन्हा एकदा बांधकाम क्षेत्रात होणारी ही अफरातफर समोर आली आहे. या क्षेत्रातील गैरप्रकार तसंच ग्राहकांची फसवणूक टळावी यासाठी 'ऱेरा'सारखा कायदा अस्तित्वात आला आहे. पण, हा कायदा असतित्वात येण्याच्या आधीपासून काही लोकांची फसवणूक होत आली आहे. अशावेळी आपलं भविष्य काय असणार याचीच चिंता या सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे.