पुणे: पुणे विद्यापीठात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी आणि अभियान महासंकल्प कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु झाल्यावर हा कार्यकर्ता ‘मुख्यमंत्री, महोदय आता तुम्ही तरी आम्हाला वाचवा’ अशा आशयाचा पोस्टर घेऊन समोर आला. त्याने मुख्यमंत्र्यांशी बोलून द्यावे, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीनंतर या तरुणाचे नाव सोमनाथ लोहार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोमनाथने आपली बाजू मांडताना म्हटले की, विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मागील काही महिन्यात आंदोलन केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते मागे घेण्यासाठी आम्ही अनेकवेळा प्रशासनाला विनंती केली. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने आज मला हे पाऊल उचलावे लागले. मला किमान पाच मिनिटे तरी मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या, अशी मागणी सोमनाथने केली.
या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, पुणे शहराचे खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय काकडे, आमदार दिलीप कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करळमकर उपस्थित होते.