Kasba Peth Pune Bypoll: राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसब्यातून लढवण्यावर ठाम! पक्षाला पाठवली 10 इच्छूक उमेदवारांची यादी

Pune Bypoll Election NCP Sent list of 10 candidates: आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यानंतर 10 इच्छूक उमेदवारांची यादीच पक्षाला पाठवण्यात आली आहे.

Updated: Jan 31, 2023, 07:53 PM IST
Kasba Peth Pune Bypoll: राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसब्यातून लढवण्यावर ठाम! पक्षाला पाठवली 10 इच्छूक उमेदवारांची यादी title=
Pune Bypoll Election NCP Sent list of 10 candidates

Pune Bypoll Election NCP Sent list of 10 candidates: पुण्यातील कसबा पेठ (Kasba peth) विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर 10 इच्छूक उमेदवारांची नावं पक्षाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकीकडे राष्ट्रवादीने ही निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं दर्शवत असतानाच काँग्रेस आणि शिवसेनेनंही यापूर्वीच कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या जागांवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या जागांवरुन आघाडीत बिघाडी होणार की निवडणूक माहविकास आघाडी म्हणून लढणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

बैठकीत काय ठरलं?

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. कसबा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील इतर पक्षामध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित हालचाल दिसत नाहीये, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांकडून धरला गेला. आजच्या बैठकीत एकूण 10 इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्याचा निर्णय झाला आहे.

इच्छूकांमध्ये कोण कोण?

शहरातील राष्ट्रवादीचे 10 नेते आणि पदाधिकारी या जागांवरुन पोटनिवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात येणार असून यामध्ये अंकुश काकडेंसहीत 10 जणांची नावं आहेत. यात अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रूपाली पाटील, शिल्पा भोसले, दत्ता सागरे यासहीत एकूण 10 जणांचा समावेश आहे.

प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

दरम्यान, कसाबा पेठेबरोबरच चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही दावा केला आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, "आघाडी म्हणून लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक दोन दिवसात ठरेल त्याबद्दल. आम्ही एकत्रित बसून काय करायचं ते ठरवू," असं म्हटलं आहे.

पोटनिवडणूक कशासाठी?

कसबा पेठ मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर दोन्ही मतदरासंघांमधील जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांवर आता पोटनिवडणुका पार पडणार आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. मुक्ता टिळक बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ५९ वर्षीय जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने सर्व पक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला होता.  या पोटनिवडणुकींसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी आहे.