राहु-मंगळ युतीमुळे अप्रिय घटनांचं सावट! 44 दिवस मेष राशीत अंगारक योग

मेष राशीत राहू-मंगळ युतीमुळे अंगारक योग तयार झाला आहे. हा योग शुभ मानला जात नाही.

Updated: Jun 27, 2022, 12:23 PM IST
राहु-मंगळ युतीमुळे अप्रिय घटनांचं सावट! 44 दिवस मेष राशीत अंगारक योग title=

Angarak Yog 2022 Effect: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर  राशी बदल करतो. 27 जूनपासून मंगळ ग्रहाने स्वत:च्या मेष राशीत प्रवेश केला आहे. या राशीत आधीच दीड वर्षांसाठी राहू ग्रहाने गोचर केला आहे. मेष राशीत राहू-मंगळ युतीमुळे अंगारक योग तयार झाला आहे. हा योग शुभ मानला जात नाही. अंगारक योगाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु त्याचा नकारात्मक प्रभाव विशेषतः तीन राशींवर असेल. ही युती 27 जूनपासून 10 ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्यामुळे 44 दिवसांपर्यंत काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर 14 जुलैपर्यंत शनिची या दोन्ही ग्रहांवर दृष्टी असेल. तर 16 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत मंगळ आणि राहु भरणी नक्षत्रात असतील. 1 ऑगस्टला दोन्ही ग्रह 24 डीग्रीत असतील. 

अंगारक योगामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या काळात हाय बीपी असलेल्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच रक्तासंदर्भातील आजार वाढण्याची शक्यता आहे. या योगामुळे भूकंपासारख्या अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. भूकंपाचा केंद्र दक्षिण पूर्व येथे असण्याची शक्यता आहे. आगीच्या घटना, रशिया युक्रेन युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. युद्धात मोठी शस्त्रे वापरली जाण्याची शक्यता आहे.

वृषभ: राहू-मंगळाच्या युतीने अंगारक योग तयार झाल्याने वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल. या दरम्यान, अनावश्यक खर्च वाढतील, ज्यामुळे आर्थिक घडी विस्कटू शकते. याशिवाय भावंडांशी वाद होऊ शकतात. या काळात जीभेवर साखर ठेवून गोड बोला आणि वाद टाळा. शत्रूंपासून सावध राहा. व्यापार्‍यांनी मोठे करार करणे टाळावे.

सिंह: सिंह राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळणार नाही. त्यामुळे सुरु असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. या काळात प्रवास न केलेलाच बरा. वाहन आरामात चालवा. बाहेरचे खाणे टाळा, अन्यथा तब्येत बिघडू शकते.

मकर: अंगारक योग मकर राशीच्या लोकांना अडचणीचा ठरेल. नोकरी-व्यवसायात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या काळात संयमाने वागा. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ: कुंभ राशीच्या लोकांना राहू-मंगळ युतीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सावध राहा. व्यवसायात नुकसान होणार नाही म्हणून काळजी घ्या आणि निर्णय घ्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)