Jyeshtha Gauri Avahana 2024 : घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. आता महिलांची लगबग सुरु झाली आहे ती ज्येष्ठ गौरी आगमनाची...गपणतीपाठोपाठ गौरी तीन दिवस माहेरी येते. माता पार्वती आणि बहीण लक्ष्मी माहेरी पाहुणचारासाठी येते. कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या गौराई असतात. गौराईला विदर्भात महालक्ष्मी म्हटलं जातं. गणपती आले आता ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे, जाणून घेऊयात.
पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला गौरी आवाहन असतं. यंदा 10 सप्टेंबर मंगळवारी ज्येष्ठ गौराईच आगमन होणार आहे.
राहू काळ : दुपारी 3 ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल.
अनुराधा नक्षत्र प्रारंभ : 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून
अनुराधा नक्षत्र समाप्ती : 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 3 मिनिटांपर्यंत असेल
भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला म्हणजे बुधवारी 11 सप्टेंबरला गौरी पूजन, नैवेद्य आणि हळदीकुंकू असणार आहे.
तर भाद्रपद शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजे गुरुवारी 12 सप्टेंबरला गौरी - गणपतीच विसर्जन आहे. यादिवशी सात दिवसांच्या बाप्पाच विसर्जन होणार आहे.
परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचा पाय दुध, पाण्याने धुवावे आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढा. घरच्या उंबऱ्यावर आत येताना पाच धान्याचे स्टीलचे ग्लास भरून ठेवा आणि पाच पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे प्रवेशद्वारापासून गौरी स्थापनेपर्यंत काढा. यानंतर शंख वाजवून गौरीचं घरात आगमन करा. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो समृध्दी येवो अशी प्रार्थना करा.
यानंतर गौरीचं स्थापना करा. म्हणजे गौरीला साडी, दागिने घालून सजवा आणि पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचं नैवेद्य दाखवला जातो.
दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जातं. गौरी पूजन म्हणजे गौराईला पाहुणाचार. हा नैवेद्य देखील प्रांतनुसार वेगवेगळा असतो. पण साधणार यात पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्याची पदार्थ केळीच्या पानावर रीतसर वाढली जातात.
नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केलं जातं.
तिसर्या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)