नववधुसांठी ओवसा का महत्त्वाचा? ओवसा म्हणजे काय आणि तो कसा भरतात?

Ovasa Gauri Pujan : संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचं आगमन झालं आहे. आता आतुरता आहे ती गौराईची.. यंदा गौरी पूर्वात बसणार आहेत. नववधु या काळात ओवसा भरतील. ओवसा म्हणजे काय? ओवसा पूर्वातच का भरला जातो? त्याची संपूर्ण माहिती...

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 8, 2024, 04:02 PM IST
नववधुसांठी ओवसा का महत्त्वाचा? ओवसा म्हणजे काय आणि तो कसा भरतात? title=

गणेश चतुर्थीच्या स्थापनेनंतर तीन ते चार दिवसांनी गौराईचं स्वागत होतं. महाराष्ट्रात अगदी थाटामाटात गौरी-गणपतीचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात कोकण पट्ट्यात गौराईचं स्वागत केलं जातं. गौराईचा ओवसा भरण्याची कोकणात प्रथा आहे. नववधुसाठी लग्नानंतरचा हा सण आणि विधी अतिशय महत्त्वाचा आहे. ओवसा म्हणजे काय? आणि त्याचं महत्त्व काय? 

काय आहे आख्यायिका?

गौरीला गणपतीच्या आईचं रुप म्हणून मानलं जातं. शंकर भगवान, गौरी आणि गणपती हे सहकुटुंब गौरीच्या माहेरी म्हणजे गणपतीच्या मामाच्या गावी गेल्याची आख्यायिका आहे. गौराई माहेरवाशिण म्हणून या दिवसांमध्ये नांदते. त्यामुळे तसाच तिचा पाहुणचार केला जातो. कुमारिका आणि सुहासिनी गौराईच्या आगमनाला जातात.काहींच्या खरी खड्यांची किंवा तेरड्याची गौराई बसवली जाते. तर काही जण अगदी मुखवट्यांची गौरी बसवतात. 

ओवसा म्हणजे काय?

कोकणातील अनेक भागात गौरीच्या आगमनानंतर ‘ओवसा’ भरला जातो. ‘ओवसा’ म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओवशाल्या ‘ववसा’ असंही म्हणतात. कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौरी पुर्व नश्रत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. यंदाची गौरी ही पूर्व नक्षत्रात आल्यामुळे सगळीकडे नववधुंच्या पहिल्या ओवसाची लगबग पाहायला मिळते. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौरीसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी  गौरी पुर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो.

ओवसा का भरतात? 

ओवसा भरणे म्हणजे ओवसणे, ओवाळणे असा आहे. ओवसा भरणे म्हणजे लग्न झाल्यावर नववधु आपल्या सासरच्या कुळात प्रवेश करते. ती नववधु यापुढे सासरचं कुळ पुढे घेऊन चालणार आहे. यानंतर सासरच्या प्रत्येक सणवारात आणि समारंभात त्या नवीन सुनेला मान सन्मान मिळावा, या उद्देशाने हा ओवसा भरला जातो. 

त्याचप्रमाणे गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते. गौरीची पुजा अर्चना करून तिच्याकडून आर्शिवाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. तसेच सुप घरातील सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. भरलेलं सुप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतिक असतं. या निमित्ताने ही सुपे वाटताना  घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोरामोठ्यांची ओळख करून दिली जाते. 

पहिला ओवसा कसा भरतात?

ओवशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपं गौराईसमोर ओवासते. ही सुपं बांबूपासून तयार केलेली असतात. काहींच्या घरी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओवसा असतो. या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो. हळदकुंकू लावले जाते. सुपात रानभाज्यांच्या पाने ठेवून मग त्यावर पाच प्रकारची फळे, सौभाग्यलेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. ही पाच अथवा दहा सुपे गौरीपुजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसून तिची भक्तीभावाने ओटी भरते. त्यानंतर ही सुपं ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते. आई-वडील, सासू-सासरे, काका-काकू, मामा-मामी, दादा-वहिनी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सुपे दिली जातात. या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी, पैसे, सोने- चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. या पद्धतींमुळे घरातील सुनेचे आणि माहेरवाशिणीचा मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे.