Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या; बुद्ध आणि वेद व्यास यांचा गुरूपौर्णिमेशी विशेष संबंध

Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म दिवस असतो. पण बुद्धांचाही गुरुपौर्णिमेशी असलेला विशेष संबंध अनेकांना माहिती नाही. 

नेहा चौधरी | Updated: Jul 3, 2023, 05:45 AM IST
Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या; बुद्ध आणि वेद व्यास यांचा गुरूपौर्णिमेशी विशेष संबंध title=
guru purnima 2023 shubh muhurt pujan vidhi and significance and ved vyas buddha puja ashadha purnima

Guru Purnima 2023 : हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा असते. गुरूपूजा आणि व्यास पूजेसाठी आजचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शास्त्रानुसार आजच्या दिवशी गुरुचा आशीवार्द मिळाला तर घरात धन, सुख समृद्धी नांदते. आजच्या दिवशी वेद व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. तसंच आषाढी पौर्णिमादेखील म्हटलं जातं. (guru purnima 2023 shubh muhurt pujan vidhi and significance and ved vyas buddha puja ashadha purnima)

गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

गुरुपौर्णिमा 2 जुलैला रात्री 8.21 वाजता सुरू झाला आहे. तर आज सायंकाळी 5.08 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. 

गुरुपौर्णिमा विशेष योग 

आज दोन विशेष योग तयार होत असून पहिला ब्रह्मयोग 2 जुलैला संध्याकाळी 7.26 वाजेपासून सुरु झाला आहे. हा योग आज दुपारी 3.35 पर्यंत असणार आहे. तर दुसरा योग इंद्र योग आज दुपारी 3.45 ते 4 जुलै 2023ला सकाळी 11.50 पर्यंत असणार आहे. 

अशी करा गुरु पौर्णिमेची पूजा 

सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करा. यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. आता घरात गुरु व्यासांची मूर्ती असेल तर तिला स्नान घालून स्वच्छ करा. त्यांना चंदन, फुलं आणि प्रसाद अर्पण करा. आता पूजन करताना 'गुरुपंरपरासिद्धयर्थं व्यासपूजां करिष्ये' या मंत्राचा जप करत राहा. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर व्यासजींच्या फोटोला सुगंधी फुलं किंवा हार अर्पण करा आणि आपल्या गुरूंची भेट घ्या. आजच्या दिवशी गुरूंना वस्त्रं, फळं आणि हार अर्पण करुन त्यांना आभार माना. यथाशक्ती धनस्वरूपात काही दक्षिणा अर्पण करून गुरुंचे आशीवार्द प्राप्त करा. 

गुरु पौर्णिमेचं महत्त्व

ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत आणि अथर पुराण यासारख्या अद्भुत साहित्याची रचना करणारे महर्षि वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेला झाला. म्हणून आजचा दिवस व्यास पौर्णिमा किंवा व्यास जयंती म्हणून पण ओळखला जातो. आजच्या दिवशी फक्त गुरुची नाही, तर तुम्हाला दिशा दाखवणारे, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल शिकविणाऱ्या प्रत्येक गुरुला आजचा दिवस समर्पित असतो. आई वडिलांसोबत ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी हे तुमचे गुरु असतात. शास्त्रानुसार आजच्या दिवशी गुरु दीक्षा आणि गुरु मंत्र घेण्यासाठी शुभ मानला जातो. 

गुरु पौर्णिमेशी बुद्धाचा विशेष संबंध 

आजचा दिवस हा बौद्ध समाजासाठीही खास असतो. बौद्ध धर्माच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांनी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील सारनाथ नावाच्या ठिकाणी पहिला उपदेश दिला होता. त्यामुळे गुरुपौर्णिमा बौद्ध समाजातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)