महाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?

Tanha Pola Festival : बैल पोळा साजरा झाला की त्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. 

नेहा चौधरी | Updated: Sep 2, 2024, 04:47 PM IST
महाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण? title=
tradition Tanha Pola was celebrated only at Vidarbha in Maharashtra the reason behind what

Tanha Pola Festival : भारत हा कृषिप्रधान देश असून महाराष्ट्रात बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण अमावस्या किंवा सोमवती अमावस्येला बैल पोळा हा सण साजरा करण्यात येतोय. आजच्या दिवशी बैलांना न्हाऊ माखू घालून त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घातल्यानंतर गावातील घरोघरी नेलं जातं आहे. महाराष्ट्रातील विदर्भात बैलपोळासह अजून एक अनेक वर्षांची परंपरा आजही पाळली जात आहे. विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. बैल पोळ्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळाचा उत्साह असतो. 

कसा साजरा होतो तान्हा पोळा? 

विदर्भात बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तो तान्हा पोळा असतो.  या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्याकारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते. आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते. 

या उत्साहाला संस्कृती आणि स्पर्धेची झालर लागली आहे. अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणतात. पोळा फुटायच्या आधी या सगळ्या छोट्या मुलांचे वेशभुषा निरीक्षण केले जाते. तसेच त्यांनी सजावुन आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते. पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभुषा व बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांका प्रमाणे नंबर देऊन, त्यांना योग्य ते पारितोषिक दिल्या जातात. 

त्यानंतर ही मुले घरी येतात. ज्याप्रमाणे मोठ्या बैलांची सर्व प्रथम घरी पुजा केल्या जाते. त्याचप्रमाणे या लाकडी बैलांच्या पूजेला देखील घरुन सुरुवात होते. त्यानंतर ही मुले आपल्या शेजारी व नातेवाईकांकडे जाऊन बोजारा जमा करतात, म्हणजे त्यांना पैसे किंवा भेटवस्तू दिल्या जातात. 

कोणी सुरु केली ही परंपरा? 

लहान मुलांना बैलांचं आणि शेतीचं महत्त्व समजावं म्हणून 1789 मध्ये नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी ही परंपरा सुरु केली. या प्रथेला यंदा 235 वर्षे पूर्ण होत आहे. आजही ही प्रथाराजे मुधोजी महाराज भोंसले यांनी सुरु ठेवली आहे. त्यांच्या निवासस्थानी असलेल्या महालातील सीनियर भोसला पॅलेसमध्ये सर्वात मोठा लाकडी बैल आजही दिमाखात उभा आहे. या बैलांची उंची आठ फूट तर लांबी सहा फूट आहे. त्याच्या पायात चांदीचा तोडा आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (द्वितीय) वाजत गाजत मिरवणूक काढायचे तीच परंपरा राजे मुधोजी महाराज भोसले यांनी कायम ठेवली आहे.