दुबई : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सशी सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज जर आज जिंकली तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावणार आहे. तर दुसरीकडे इयन मॉर्गन केकेआरला टीमला चॅम्पियन बनवण्यासाठी धडपडत आहे. मॉर्गन आणि धोनीने त्यांच्या कर्णधारपदाखाली बराच प्रवास केला आहे. पण दोन्ही कर्णधारांचा फॉर्म फलंदाजीच्या बाबतीत खूपच खराब आहे.
40 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या या सीझनमध्ये एकूण 15 सामने खेळले आहेत. यावेळी धोनीने 16.28 सरासरी आणि 106.54 स्ट्राईक रेट प्रमाणे केवळ 114 रन्स बनवले आहेत. धोनीचा सर्वोच्च स्कोअर नाबाद 18 आहे, जो त्याने दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध शेवटच्या सामन्यात केला होता.
तर दुसरीकडे 35 वर्षीय इयोन मॉर्गनचा फॉर्म धोनीपेक्षा वाईट आहे. मॉर्गनने सध्याच्या आयपीएल हंगामात 16 सामन्यांत 11.72 च्या सरासरीने 129 धावा केल्या आहेत. या दरम्यान, तो 10 डावांमध्ये दुहेरी अंक देखील गाठू शकला नाही. तर चार वेळा तो खातं न उघडता आऊट झाला आहे. आयपीएल 2021 मध्ये मॉर्गनची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 47 आहे.
धोनीची गणना टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीन आयसीसी विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाली. 2007 च्या पहिल्या टी -20 वर्ल्ड कप धोनीचा संघ चॅम्पियन बनला. त्यानंतर 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला. शिवाय धोनीने 2013 मध्ये त्याच्या कर्णधारपदाखाली भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावलं.
इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावलं. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात इंग्लंड संघ चौकाराच्या आधारे विजेता ठरला. दोन्ही संघांनी निर्धारित 50 षटकांत 241 धावा केल्या होत्या, त्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता.