मुंबई : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या जगभरातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. मागच्या काही वर्षांपासून स्मिथची कामगिरी दिवसेंदिवस उत्तम होत चालली आहे. पण स्मिथची कर्णधार म्हणून करण्यात आलेल्या निवडीवर नवा खुलासा झाला आहे.
२०१४ साली मायकल क्लार्क दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर स्मिथला कर्णधार बनवण्यात आलं. बारमध्ये दारू पिताना स्मिथला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. खुद्द स्मिथनंच ही धक्कादायक कबुली दिली आहे. २०१४मध्ये स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सगळ्यात तरुण टेस्ट कर्णधार बनला.
ऍडलेड ओव्हल टेस्टनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सदस्य मार्क टेलर आणि ब्रॅड हॅडीन स्टिव्ह स्मिथबरोबर बारमध्ये दारू प्यायला बसले होते. तेव्हा स्मिथनं हॅडिनला कर्णधार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. टेलरनंही स्मिथच्या प्रस्ताव मान्य केला. पण भविष्याचा विचार करून हॅडिननं स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवायला सांगितलं. स्मिथनं त्याचं आत्मचरित्र 'द जर्नी'मध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.
हॅडीनच्या या प्रस्तावावर मला आणि टेलरला आश्चर्य वाटल्याचं स्मिथ म्हणालाय. यानंतर टेलर आणि हॅडीननं कर्णधारपदासाठी तू तयार आहेस का असा प्रश्न विचारला. तेव्हा मला ते दोघं मस्करी करत असल्यासारखं वाटल्याचं स्मिथनं त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहीलं आहे.
कर्णधार होण्यासाठी मी होकार दिला त्यानंतर टेलरनं याबद्दल मी बोलून तुला फोन करतो असं सांगितल्याचं स्मिथ म्हणाला. यानंतर दुसऱ्या दिवशी टेलरनं स्मिथला फोन केला आणि तो ऑस्ट्रेलियाचा ४५ वा कॅप्टन बनला. पुढच्याच आठवड्यामध्ये मार्क टेलरनं स्मिथला कॅप्टनचा ब्लेझर दिला आणि त्यानंतर गाब्बामध्ये भारताविरुद्धची टेस्ट ऑस्ट्रेलिया स्मिथच्या नेतृत्वात जिंकली.