Anushka Sharma Pregnant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विश्रांती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर अनेकांनी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहलीने तिच्यासह वेळ घालवण्यासाठी विश्रांती घेतल्याची चर्चा रंगली होती. पण यासंबंधी विराट कोहली, अनुष्का शर्मा किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी काही अधिकृत माहिती दिली नव्हती. पण अखेर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा खास मित्र एबी डेव्हिलिअर्स (AB De Villiers) याने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्याने विराट आणि अनुष्का दुसऱ्या बाळाची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यातून विश्रांती घेतली आहे. दरम्यान त्याने पत्नी अनुष्का शर्मा गर्भवती असल्याने विश्रांती घेतल्याचा खुलासा एबी डेव्हिलिअर्सने केला आहे. एबी डेव्हिलिअर्स आपल्या युट्यूब चॅनेलवर चाहत्यांशी संवाद साधताना हा खुलासा केला आहे.
एबी डेव्हिलिअर्स सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. यावेळी एका चाहत्याने त्याला विराट कोहलीसंबंधी प्रश्न विचारला असता त्याने ही माहिती दिली. तो म्हणाला की, "मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकत नाही. पण तो चांगला आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा असल्याने त्याने इंग्लंडविरोधातील सामन्यांमधून विश्रांती घेतली आहे. यापेक्षा जास्त माहिती मी देऊ शकत नाही पण मी त्याला पुन्हा खेळताना पाहण्याची जास्त वाट पाहू शकत नाही".
AB De Villiers said, "Virat Kohli and Anushka Sharma are expecting their 2nd child, so Virat is spending time with his family". (AB YT). pic.twitter.com/qurRKnFK1q
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 3, 2024
यावेळी एबी डेव्हिलिअर्सने विराट कोहलीने त्याच्या मेसेजला दिलेलं उत्तर वाचून दाखवलं. "मी चांगला आहे. सध्या कुटुंबासह वेळ घालवत आहे," असं विराटने त्यात लिहिलं होतं. पुढे बोलताना त्याने विराट आणि अनुष्का दुसऱ्या बाळाची वाट पाहत असल्याचं सांगितलं.
"जर तुम्ही स्वत:शी प्रामाणिक नसाल तर लक्ष विचलित होऊ शकतं. या पृथ्वीवर तुम्हाला सर्वात जास्त प्रिय काय आहे असं कोणी विचारलं तर कुटुंब हेच प्रत्येकाचं उत्तर असेल. त्यामुळे त्यासाठी तुम्ही एखाद्याबद्दल मत तयार करु शकत नाही," असंही तो म्हणाला.
विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतली होती. याच कारणामुळे तो गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यालाही मुकला होता. विराट कोहली वारंवार क्रिकेटमधून विश्रांती का घेत आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यादरम्यान त्याच्या आईची प्रकृती नीट नसल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण त्याच्या भावाने हे वृत्त फेटाळलं होतं. पण आता डिव्हिलियर्सने चाहत्यांच्या सर्व शंका दूर केल्या आहेत.
अनुष्का पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण विराट किंवा अनुष्काने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. अनुष्का तिच्या बेबी बंपसह काही कार्यक्रमात दिसली होती. पण ठोस माहिती कोणाकडेच नव्हती.