दक्षिण आफ्रिकेविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात राशीद खानने (Rashid Khan) जबरदस्त गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. राशीद खानच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने 311 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 134 धावांवर रोखलं. दरम्यान 5 विकेट्स घेत राशीद खानने एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. राशीद खान आपल्या वाढदिवशी 5 विकेट्स घेणारा 53 वर्षांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला आहे. राशीद खान शुक्रवारी 26 वर्षांचा झाला. याआधी एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजाची सर्वोत्तम आकडेवारी 4/12: व्हर्नन फिलँडर (आयर्लंडविरुद्ध 2007) आणि 4/44: स्टुअर्ट ब्रॉड (ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2010) अशी होती.
फिरकीपटू रशीद खानच्या शानदार पाच विकेट्सच्या जोरावर अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी सनसनाटी पराभव करत मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरोधात त्यांनी पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 177 धावांचा विजय हा अफगाणिस्तानचा एकदिवसीय सामन्यातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. याआधी झिम्बॉब्वे विरुद्धचा सामना त्यांनी 154 धावांनी जिंकला होता.
अफगाणिस्तानने बुधवारी पहिला सामना सहा गडी राखून जिंकला होता आणि शुक्रवारच्या विजयाने त्यांना तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजचे झंझावाती शतक आणि रहमत शाह (50) आणि अझमतुल्ला उमरझाई (नाबाद 86) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 50 षटकांत 311/4 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजचे झंझावाती शतक आणि रहमत शाह (50) आणि अझमतुल्ला उमरझाई (नाबाद 86) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 50 षटकांत 311/4 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेला 73 धावांच्या सलामीच्या भागीदारीचा फायदा घेता आला नाही, मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले आणि संघ 34.2 षटकात 134 धावांवर गुंडाळला गेला. 15 षटकं शिल्लक असताना दक्षिण आफ्रिकेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. राशिद खानसह आणि नांगेलिया खरोटेने 5 विकेट्स घेतल्या.