Gulbadin Naib: टी-20 वर्ल्डकपमध्ये सोमवारी रात्री भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंजक सामना झाला. तर मंगवारी सकाळी अफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेश यांच्यात थरारक सामना रंगला होता. अखेर या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशाचा पराभव करत इतिहासात पहिल्यांदाच टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं. या सोबतच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर काढलं आहे. दरम्यान बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात एक घटना घडली. ज्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय.
सुपर-8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून अफगाणिस्तानने प्रथमच वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना लो स्कोर, सततचा पाऊस, डकवर्थ लुईस, विजयानंतरचं सेलिब्रेशन, आनंदाश्रू आणि कथित क्रॅम्पची दुखापत या सर्व गोष्टींमुळे लक्षात राहणार आहे. मात्र सामन्यातील एक घटनेवरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात येतंय. गुलबदीन नायब आणि प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांच्यावर चिटींगचा आरोप करण्यात येतोय.
सेंट व्हिन्सेंट इथल्या अर्नोस व्हॅले मैदानावर खेळला गेलेला सामना वारंवार पावसामुळे थांबवावा लागत होता. यावेळी 12 व्या ओव्हरमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यावेळी डगआउटमध्ये उपस्थित असलेले अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी आपल्या खेळाडूंना खेळ काहीसा हळू करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान याचवेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदीन नायबवर कॅमेरा फोकस केला गेला. यावेळी नायब पायाला हात लावून खाली पडला.
This has got to be the most funniest thing ever Gulbadin Naib just breaks down after coach tells him to slow things down pic.twitter.com/JdHm6MfwUp
— Sports Production (@SportsProd37) June 25, 2024
दरम्यान, पावसाने जोर धरल्याने मैदानावरील कर्मचारी पीच झाकण्यासाठी धावले. यावेळी अफगाणिस्तान डीएलएस पद्धतीनुसार दोन रन्सने पुढे होतं. खराब हवामानामुळे सामना पुन्हा सुरू झाला नसता तर अफगाणिस्तानला विजेता घोषित केलं गेलं असतं. डकवर्थ लुईस पद्धतीनुसार बांगलादेशचा विजय रोखण्यासाठी गुलबदीन नायबने हे कृत्य केल्याचा आरोप सोशल मीडियावरील यूजर्स करतायत.
गुलबद्दीन नायब मैदानातून बाहेर पडताच पाऊस आला आणि पावसामुळे सामना एक ओव्हरने कमी झाला. त्यानंतर बांगलादेश टीमला विजयासाठी 19 ओव्हरमध्ये 114 रन्सचं लक्ष्य मिळालं. मात्र गुलबदीन मैदानाबाहेर गेल्याने कर्णधार राशिद खान आनंदी दिसला नाही. विशेष बाब म्हणजे गुलबदिन नायब 13व्या ओव्हरमध्ये मैदानावर परतला आणि त्याने 15 वी ओव्हरही फेकली. या षटकात त्याने तंजीम हसनची विकेट घेतली. त्यामुळे त्याच्या दुखापतीवर सर्वांनीच प्रश्न उपस्थित केलं. गुलबदीनबद्दल सोशल मीडियावर अनेक मीम्स बनवले गेले आणि त्याला ट्रोलचा सामना करावा लागला. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, गुलबदीनने दुखापतीचे निमित्त करून वेळ वाया घालवला.