Ajinkya Rahane WTC Final 2023: अनपेक्षित ठरत असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा दैणा उडाली. कांगारूंना एकटा नडला तो अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). एकाच पाईंटवर उसळी घेत असलेल्या बॉलने रहाणे, शार्दुल ठाकूर इतकंच नाही तर लाबुशेनला देखील सोडलं नाही. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या (WTC Final 2023) खेळपट्टीवर अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. सामन्यात पारडं जड वाटतंय ते ऑस्ट्रेलियाचं. मात्र, जोपर्यंत अजिंक्य आहे तोपर्यंत चिंता कसली?
सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रादरम्यान, कांगारू संघाने 44 षटके खेळून काढली. यादरम्यान अजिंक्य रहाणे मैदानावर आला नाही. पहिल्या डावात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. पॅट कमिन्सचा बॉल खेळताना त्याचं बोट डिस्लोकेट झालं, त्यानंतर देखील अजिंक्य मैदानात पाय रोऊन उभा होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने दुखापतीबाबत माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण टीमच्या आणि भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढलं होतं. अशातच सामना संपल्यानंतर सौरव गांगुली याने एक प्रश्न विचारला त्यावर रहाणेने आत्मविश्वासाने उत्तर दिलंय.
सौरव गांगुली याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यांनतर रहाणेसोबत संवाद साधला. त्यावेळी दादाने रहाणेवर प्रश्नाचा भडिमार केला आणि प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गांगुलीने एक गुगली टाकली. किती चेज करु शकाल?, असा प्रश्न गांगुलीने रहाणेला विचारला. त्यावर ऑस्ट्रेलिया देईल तेवढं, असं खणखणीत उत्तर अजिंक्य रहाणेने दिलं.
दरम्यान, शार्दुल ठाकूरने अजिंक्य रहाणेसोबत 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताला 296 धावांपर्यंत नेलंय. खेळपट्टी सामन्यासाठी पूर्णपणे तयार नाही, असं वक्तव्य शार्दुल ठाकूर याने केलं होतं. मात्र, कोणतीही तक्रार न करता अजिंक्य रहाणे मैदानात टिकून राहिला. कधी हाताला बॉल लागला तर कधी कोपऱ्याला मात्र अजिंक्यने मैदान काही सोडलं नाही. तो बाहेर पडला आऊट झाल्यावरच. त्यामुळे एवढं नक्कीच म्हणावं लागेल अज्जू भावा मानलं रे तुला...!
इंडिया (Playing XI):
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (WC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया (Playing XI):
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (WC), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.