दुसऱ्या टेस्टमध्येही रहाणेला संधी नाही?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सेन्चुरिअनमध्ये सुरुवात होत आहे.

Updated: Jan 12, 2018, 07:17 PM IST
दुसऱ्या टेस्टमध्येही रहाणेला संधी नाही?  title=

सेन्चुरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सेन्चुरिअनमध्ये सुरुवात होत आहे. केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर आत सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.

ही टेस्ट मॅच सुरु व्हायच्या आधी भारतीय टीमनं जोरदार सराव केला. चेतेश्वर पुजारानं स्लिपमध्ये कॅच पकडण्याचा तर विराट कोहली आणि रोहित शर्मानं नेटमध्ये बॅटिंगचा सराव केला. पण टीमचा सराव सुरु असताना अजिंक्य रहाणे दर्शक म्हणूनच उभा राहिलेला दिसला. त्यामुळे रहाणेला दुसऱ्या टेस्टमध्येही संधी मिळणार नाही, असं बोललं जातंय.

अजिंक्य रहाणे आणि शिखर धवननं शेवटी सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगरसोबत थ्रोचा सराव केला. या दोघांनी नेटमध्ये जलद बॉलिंगचा सामना केला नाही. के.एल.राहुल, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी मात्र नेटमध्ये कसून सराव केला. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये धवनच्याऐवजी मुरली विजयबरोबर के.एल.राहुल मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये धवनची सरासरी ४२.६२ आहे. पण दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये धवननं ११ टेस्टमध्ये २७.८१च्या सरासरीनं रन्स बनवल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये धवननं ३ टेस्ट मॅच खेळल्या. या मॅचमध्ये धवनचा सर्वाधिक स्कोअर २९ रन्स आहे. आफ्रिकेमध्ये धवनची सरासरी फक्त १८ आहे.