close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अंबाती रायडू दोन मॅचसाठी निलंबित

हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडूवर दोन मॅचची बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Jan 31, 2018, 04:45 PM IST
अंबाती रायडू दोन मॅचसाठी निलंबित

मुंबई : हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडूवर दोन मॅचची बंदी घालण्यात आली आहे. ११ जानेवारीला सैयद्द मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीतल्या मॅचमध्ये रायडूनं अंपायरशी हुज्जत घातली होती. मॅच संपल्यावरही रायडू मैदानामध्येच होता. त्यामुळे रायडू आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादच्या पहिल्या दोन मॅचमध्ये खेळणार नाही. बीसीसीआयनं प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

काय होता वाद?

सैय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमधल्या कर्नाटक आणि हैदराबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये खेळाडूंचा जोरदार हंगामा पाहायला मिळाला. या मॅचमध्ये कर्नाटकनं पहिले बॅटिंग केली, पण इनिंग संपल्यावर अंपायरनी रिप्ले बघितले तेव्हा चूक सुधारून स्कोअरमध्ये २ रन्स जोडल्या. हैदराबादचा या मॅचमध्ये बरोबर दोन रन्सनीच पराभव झाला. यानंतर हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडू आणि टीमनं मैदानात हंगामा करायला सुरुवात केली.

या सगळ्या प्रकारामध्ये हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडूची चूक असल्याचं बोललं जातं होतं. हैदराबादची बॅटिंग सुरु व्हायच्या आधीच रायडूनं अंपायरसोबत चर्चा करायला हवी होती, असा दावा केला जात होता. या सगळ्या प्रकारावर अंबाती रायडूनं स्पष्टीकरणही दिलं होतं. मी अंपायरशी बातचित केली तेव्हा याचा निर्णय मॅच संपल्यावर होईल, असं सांगण्यात आल्याचं रायडू म्हणाला होता. एक तास चाललेल्या या हंगाम्यामुळे नंतर आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये होणारी मॅच १३-१३ ओव्हर्सचीच खेळवण्यात आली होती.

नेमकी काय चूक झाली?

या मॅचमध्ये टॉस जिंकून कर्नाटकनं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्नाटकचा ओपनर करुण नायरनं मोहम्मद सिराजच्या बॉलवर मिडविकेटला फोर मारली. ही फोर वाचवताना हैदराबादच्या मेहंदी हसननं पायानं फिल्डिंग केली. पण सीमारेषेला हसनचा पाय लागला. या गोष्टीची अंपायरना माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी चारऐवजी २ रन्सच दिल्या.

टीव्ही रिप्ले बघितल्यानंतर कर्नाटकच्या खेळाडूंनी थर्ड अंपायरला याबाबत माहिती दिली आणि स्कोअरमध्ये २ रन्स वाढवण्यात आल्या. पण स्कोअरर आणि अंपायरमध्ये ताळमेळ नसल्यामुळे या २ रन्स वाढवण्यात आल्या नाहीत.

दोन रन्समुळे गोंधळ

२०५ रन्सचा पाठलाग करताना हैदराबादनं २० ओव्हरमध्ये २०३ रन्स बनवल्या. पण मॅच संपल्यानंतर हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडू टीमसोबत मैदानात आला आणि त्यानं सुपर ओव्हरची मागणी केली. मला नियम माहिती आहेत. जर अंपायरनं खेळाडूला आऊट दिलं आणि तो पॅव्हेलियनमध्ये गेल्यावर चुकीचं आऊट दिल्याचं लक्षात आलं तर त्याला पुन्हा बॅटिंगला बोलवलं जातं का? असा सवाल अंबाती रायडूनं उपस्थित केला होता.

अंपायरनं एखादा नो बॉल दिला नाही आणि थोड्यावेळानं तो नो बॉल असल्याचं लक्षात आलं तर स्कोअरमध्ये रन्स जोडल्या जातात का? पण अंपायरनी निर्णय देऊन कर्नाटकला विजेता घोषीत करण्यात आलं होतं, असं रायडू म्हणाला होता.