बॅटिंगचा कंटाळा नाही का आला? पुजारासमोर कांगारूंचं हतबल स्लेजिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला.

Updated: Feb 13, 2019, 07:45 PM IST
बॅटिंगचा कंटाळा नाही का आला? पुजारासमोर कांगारूंचं हतबल स्लेजिंग title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्याच मैदानात पराभूत करण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला चेतेश्वर पुजारा. ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये चेतेश्वर पुजारानं तब्बल ५२१ रन केल्या. यामध्ये ३ शतकं आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. पुजारानं ऑस्ट्रेलियाच्या एका दौऱ्यात टेस्टमध्ये सर्वाधिक बॉल खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर केला. याआधी राहुल द्रविडनं २००३-०४ सालच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियामध्ये १,२०३ बॉल खेळले होते.

ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यामध्ये आलेले मजेशीर अनुभव आणि स्लेजिंगबद्दल पुजारा बोलला आहे. या सीरिजमधला ऑस्ट्रेलियान खेळाडूंनी केलेला स्लेजिंगचा सर्वोत्तम क्षण पुजारानं सांगितला. 'आमच्या ४० रनवर ४ विकेट पडल्या होत्या. १५०-१६० रनमध्ये आमचा ऑल आऊट होईल, असं ऑस्ट्रेलियाला वाटत होतं. तिसऱ्या का चौथ्या टेस्टमध्ये त्यांनी मला डिवचण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी हसायला सुरुवात केली. लायन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तुला बॅटिंगचा कंटाळा नाही का आला? तू एवढ्या रन केल्या आहेस'. पुजारानं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असं काही म्हणतील, याचा मी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया पुजारानं दिली.

२०१७ साली ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आलेली असतानाचा अनुभवही पुजारानं या मुलाखतीमध्ये सांगितला. '२०१७ साली आम्ही रांचीमध्ये टेस्ट मॅच खेळत होतो. मी १७० रनवर खेळत होतो, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मला म्हणाला, तू आऊट झाला नाहीस, तर आता आम्हाला व्हीलचेअर मागवाव्या लागतील,' अशी आठवण पुजारानं सांगितली.