दिल्ली : फेब्रुवारीमध्ये इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सिरीज खेळणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही टीममध्ये टी-20 सिरीजही खेळवली जाणारे. तर कर्णधार रोहितच्या कमबॅकनंतर अनेक खेळाडू टीममध्ये परतलेत. तर काही खेळाडूंना पुन्हा बाहेरचा रस्ता मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती, तेव्हा एका खेळाडूला चार वर्षांनंतर टीममध्ये स्थान देण्यात आलं होतं. मात्र काही सामन्यांनंतर या खेळाडूला पुन्हा एकदा टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. हा खेळाडू म्हणजे रविचंद्रन अश्विन.
कसोटी क्रिकेटमधील भारताचा उत्तम स्पिनर मानल्या जाणाऱ्या अश्विनने बऱ्याच काळानंतर वनडे आणि टी-20 टीममध्ये स्थान निर्माण केलं होतं. पण आता कर्णधार रोहित येताच हा खेळाडू पुन्हा एकदा टीमबाहेर गेला आहे.
रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटनंतर आता पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्येही अप्रतिम कामगिरी करण्यास सुरुवात केलीये. अश्विन गेल्या चार वर्षांपासून टी-20 आणि एकदिवसीय टीमतून बाहेर होता. मात्र, टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने उत्तम कमबॅक केलं. टी-20 वर्ल्डकपनंतर अश्विनने न्यूझीलंडविरुद्धही चांगली गोलंदाजी केली. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत उत्तम गोलंदाजी करत अनेक विकेट्सही घेतल्या. मात्र पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलंय.
विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला नुकतंच वनडे टीमची धुरा सोपवण्यात आलीये. रोहितला यापूर्वीच टी-20 टीमचा कर्णधार बनवण्यात आलं होतं.