विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला आहे. या मॅचमध्ये अश्विनने ७ आणि १ अशा एकूण ८ विकेट घेतल्या. याचबरोबर अश्विनने श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अश्विन हा सगळ्यात जलद ३५० विकेट घेणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर अश्विनने थियुनिस डि ब्रूयुनला बोल्ड करुन आपली ३५०वी विकेट घेतली. आपल्या ६६व्या टेस्टमध्ये अश्विनने ३५० विकेटचा टप्पा गाठला. मुरलीधरनलाही ३५० विकेट घ्यायला ६६ टेस्ट मॅचच लागल्या होत्या.
अश्विनने ६६ टेस्ट मॅचमध्ये २७ वेळा इनिंगमध्ये ५ विकेट आणि ७ वेळा मॅचमध्ये १० विकेट घेतल्या आहेत. घरच्या मैदानात अश्विनच्या २४२ विकेट झाल्या आहेत. २५० विकेटचा टप्पा गाठायला अश्विनला आणखी ८ विकेटची गरज आहे.
पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेऊन अश्विनने डेल स्टेनलाही मागे टाकलं आहे. स्टेनने त्याच्या टेस्ट कारकिर्दीत २६वेळा ५ विकेट घेतल्या आहेत. तर अश्विनने ५ विकेट घेण्याच्याबाबतीत जेम्स अंडरसन आणि इयन बोथमची बरोबरी केली आहे. सर्वाधिकवेळा ५ विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन ७व्या क्रमांकावर आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीने ६७वेळा ५ विकेट घेतल्या आहेत.
भारताकडून सगळ्यात जलद ३५० विकेट घेण्याचा विक्रमही अश्विनच्या नावावर झाला आहे. अनिल कुंबळेने ७७ मॅचमध्ये ३५० टेस्ट विकेट घेतल्या होत्या, तर हरभजन सिंगने ८३ टेस्ट मॅचमध्ये ३५० विकेटचा टप्पा गाठला होता.