Asia Cup 2022 : सामन्याआधी एकमेकांसमोर आले भारत-पाकिस्तानचे खेळाडू

भारत-पाकिस्तान सामन्याआधी रोमांच वाढला आहे. भारतीय संघ आज प्रशिक्षणासाठी मैदानावर उतरला. तेव्हा पाकिस्तानचे खेळाडू देखील मैदानावर आले होते.

Updated: Aug 24, 2022, 10:01 PM IST
Asia Cup 2022 : सामन्याआधी एकमेकांसमोर आले भारत-पाकिस्तानचे खेळाडू title=

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. आज मैदानावर प्रशिक्षणाला सुरुवात झाली. व्हीव्हीएस लक्ष्मणला या स्पर्धेसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने प्रशिक्षण सुरू केले आहे. नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) कोरोनातून मुक्त झाल्यानंतर संघात सामील होणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar azam) यांची भेट झाली.

कोहलीने बाबरसोबत हात मिळवला. थोडा वेळ त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानी संघातील इतर सदस्यही त्यांना पाहून हसत होते. बाबर आणि विराटची तुलना नेहमीच केली जाते. बाबरने फार कमी कालावधीत आपले नाव कमावले असून त्याची तुलना कोहलीशी केली जाते.
 
व्हिडिओमध्ये कोहलीशिवाय हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक आणि अर्शदीप सिंगसह इतर खेळाडू देखील दिसले. चहल आणि हार्दिक यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भेट घेतली.

हार्दिक हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. राशिद खानही त्याच्या नेतृत्वाखाली खेळतोय. रशीदसोबत हार्दिकने दीर्घ संवाद साधला. यावेळी मोहम्मद नबी तेथे उपस्थित होता. विराट रशीदशीही बोलला.

दहा महिन्यांनंतर 28 ऑगस्ट रोजी दुबईत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) संघ आमने-सामने येणार आहेत. दोघेही 24 ऑक्टोबर 2021 रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकाच मैदानावर खेळले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता. आशिया चषकातील भारत-पाक संघर्षाबद्दल बोलायचे झाले तर येथे टीम इंडियाचा वरचष्मा आहे. त्यांनी 14 पैकी आठ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशिया चषक स्पर्धेत नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा झाला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सात आणि पाकिस्तानने तीन वेळा विजय मिळवला आहे. भारत-पाक सामना सोडला तर आशिया चषकातही भारत सर्वोत्तम संघ ठरला आहे. भारत सात वेळा विजेता ठरला आहे, तर तीन वेळा उपविजेता ठरला आहे. पाकिस्तानने दोनदा विजेतेपद पटकावले आहे.