‘जो बार-बार गलती करें वो पाकिस्तान!’ देश सिरीझमधून बाहेर पडल्यानंतर खेळण्यासाठी श्रीलंकेत पोहोचला शाहनवाज

पाकिस्ताचा क्रिकेटर शाहनवाज आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या अपेक्षेने श्रीलंकेत दाखल झाला. पण त्याचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. कारण शाहनवाज श्रीलंकेत दाखल झाला अन् दुसरीकडे पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला.   

शिवराज यादव | Updated: Sep 15, 2023, 07:19 PM IST
‘जो बार-बार गलती करें वो पाकिस्तान!’ देश सिरीझमधून बाहेर पडल्यानंतर खेळण्यासाठी श्रीलंकेत पोहोचला शाहनवाज title=

एखाद्या खेळाडूचं नशीब किती दुर्दैवी असू शकतं याचं उदाहरण म्हणजे पाकिस्तानचा खेळाडू ठरला आहे. याचं कारण आपल्या देशासाठी अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळत असल्याने खेळाडू हॉटेलवर पोहोचला अन् दुसरीकडे त्याचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहनवाज दहानी याच्यासह हा दुर्दैवी प्रकार घडला. नसीम शाहला दुखापत झाल्याने शाहनवाज त्याच्या जागी खेळण्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला होता. पण एकीकडे शाहनवाज हॉटेलमध्ये पोहोचला आणि दुसरीकडे त्याचा देश श्रीलंकेविरोधातील सामन्यात हारला आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला. 

पाकिस्तानने एक्सवरील आपल्या अधिकृत पेजवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी शाहनवाज दहानी श्रीलंकेत पोहोचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही पोस्ट 15 सप्टेंबरला रात्री 12 वाजून 29 मिनिटांना करण्यात आली आहे. म्हणजे 14 सप्टेंबरला मध्यरात्री ही पोस्ट शेअर करण्यात आली. पाकिस्तानने फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "शाहनवाज दहानी आज श्रीलंकेत पोहोचला आहे". याच दिवशी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 फेरीतील सामना होणार होता आणि जिंकणारा संघ अंतिम सामन्यात दाखल होणार होता. 

पाकिस्तानच्या पराभवानंतर दहानीला केलं जात आहे ट्रोल

पाकिस्तान संघाचा पराभव होताच सोशल मीडियावर शाहनवाज दहानी ट्रोल होऊ लागला. काहींनी तर तू यायलाच नको होतंस असं म्हटलं. काहींनी त्याला तू पुन्हा मायदेशी निघून जा असा सल्ला दिला. 

पाकिस्तान आणि श्रीलंकेमधील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 42 ओव्हर्समध्ये 252 धावा ठोकल्या. डीएलएस नियमांतर्गत श्रीलंकेला हेच लक्ष्य देण्यात आलं. यानंतर श्रीलंकेने दमदार सुरुवात केली होती. पण 91 धावा ठोकल्यानंतर कुसल मेंडिस बाद झाला आणि नंतर विकेट्सची रांगच लागली. 

शेवटच्या चेंडूवर जिंकली श्रीलंका

समरविक्रमाने 48 धावा केल्या आणि तोही बाद झाला. यानंतर असलंकाने एका बाजूने लढा दिला. पण श्रीलंकेने 210 ते 246 धावांदरम्यान अचानक 5 विकेट गमावल्या. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची गरज होती. जमान खान गोलंदाजी करत होता, तर असलंका आणि प्रमोद मैदानात होते. चौथ्या चेंडूवर प्रमोद आऊट झाल्यावर पाकिस्तानला विजयाची आशा दिसत होती. पण शेवटच्या दोन चेंडूंत असलंकाने प्रथम एक चौकार आणि नंतर आवश्यक असलेल्या 2 धावा काढत या रोमांचकारी सामन्यात विजय मिळवून दिला.