आशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या महिला रिले टीमला सुवर्ण पदक

भारतानं १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं आहे.

Updated: Aug 30, 2018, 09:59 PM IST
आशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या महिला रिले टीमला सुवर्ण पदक

जकार्ता : भारतानं १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं आहे. भारतीय महिला रिले टीमनं 4x400मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं. या स्पर्धेतलं भारताचं हे १३वं सुवर्ण पदक आहे. याआधीच काही वेळापूर्वी जिनसन जॉनसननं पुरुषांच्या १५०० मीटर स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं.

महिलांच्या 4x400मीटर रिलेमध्ये भारताकडून हिमा दास, पुवम्मा राजू, सरिताबेन गायकवाड आणि विसमाया वेलुवाकोरोथ यांनी भाग घेतला होता. या चौघींनी ३ मिनीट २८.७२ सेकंदामध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारतीय टीम रेकॉर्ड बनवण्यापासून .०५ सेकंदांनी चुकली. गेमचं रेकॉर्ड ३ मिनीट २८.६८ सेकंद आहे. एथलिटिक्समध्ये या आशियाई स्पर्धेतलं भारताचं हे ९वं सुवर्ण तर एकूण १३वं सुवर्ण पदक आहे. या इव्हेंटमध्ये मागच्या आशियाई स्पर्धेतही भारतानं सुवर्ण पदक जिंकलं होतं.

भारतीय टीमनं या स्पर्धेमध्ये एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरच्या टीम भारतीय टीमपेक्षा खूप मागे राहिल्या. सुरुवातीला आसामची १८ वर्षीय हिमा दास जलद पुढे निघून गेली तिच्यामुळेच भारताला सुरुवातीला आघाडी मिळाली. यानंतर उरलेल्या तिघींनी आघाडी कायम ठेवत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळवून दिलं.

बहरीनला रौप्य आणि व्हिएतनामला कांस्य पदक

4X400 मीटर रिले मध्ये बहरीनला रौप्य आणि व्हिएतनामला कांस्य पदक मिळाले. बहरीननं ३ मिनीट ३०.६२ सेकंद तर व्हिएतनामनं ३ मिनीट ३३.२३ सेकंद लावली.

भारताचं १३वं सुवर्ण पदक एकूण ५९ पदकं

आशियाई स्पर्धेच्या १२व्या दिवशी भारताची पदकांची संख्या ५९ वर पोहोचली आहे. याचबरोबर भारतानं मागच्या आशियाई स्पर्धेचं रेकॉर्ड मोडलं आहे. भारतानं मागच्या स्पर्धेमध्ये ११ सुवर्ण पदकांसह ५७ पदकं जिंकली होती.