Asian Games 2023 Indian Cricketer Wife Won Medal: एकीकडे भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे चीनमधील हांझोउमध्ये आशियाई खेळांची स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी पटकावलेल्या पदकांच्या संख्येनं अर्धशतक गाठलं आहे. या पदकांमध्ये एक पदक फारच खास आहे. कारण हे पदक भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने पटकावलं आहे. हे पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडूचं नाव आहे आरती कस्तुरीराज! आरती ही भारतीय क्रिकेटपटू संदीप वॉरियरची पत्नी आहे. संदीप मागील अनेक वर्षांपासून तिच्या संघर्षामध्ये तिच्यासोबत आहे.
आरती ही रोलर स्केटिंगपटू आहे. तिने नुकतेच भारतासाठी आशियाई खेळांमध्ये पदक जिंकला आहे. संदीप वॉरियर हा मध्यम गती गोलंदाज असून तो तामिळनाडूकडून घरगुती स्पर्धा खेळतो. संदीप वॉरियर आयपीएलमध्येही खेळला आहे. त्याने 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामनाही खेळला आहे. आरतीने सोमवारी आशियाई खेळांमध्ये रोलर स्टेटिंगच्या 3000 मीटर रिले या सांघिक खेळामध्ये कांस्य पदक पटकावले. या विजयानंतर संदीपने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, "मला तिचा फार अभिमान वाटतो. मी तिच्या कामगिरीवर फार समाधानी आहे. तिला पदक जिंकण्यात यश आलं याचा मला फार आनंद वाटतो. मी मागील 7 ते 8 वर्षांपासून तिचा संघर्ष जवळून पाहिला आहे. तिने या कालावधीमध्ये कधीच हार मानली नाही. ती कठोर परिश्रम करत होती," असं म्हटलं आहे.
"मागील 2 वर्षांमध्ये तिने किती मेहनत केली आहे, हे मी पाहिलं आहे. तिचं खेळाबद्दल असणारं प्रेम आणि समर्पण मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. तिचं लक्ष्य केवळ पदक जिंकण्याचं होतं. तिने मागील 2 ते 3 वर्षांमध्ये कधीच ब्रेक घेतलेला नाही," असंही संदीप वॉरियरने सांगितलं.
Congratulations to Karthika Jagadeeswaran, Heeral Sadhu & Aarathy Kasturi Raj on their outstanding performance in the women’s speed skating 3000m Relay Race for securing the bronze medal by clocking a timing of 4:34.861
A fantastic effort from our women skaters#AsianGames pic.twitter.com/9aDQB9Aats
— Sharat Chandra Bhatt (@imsbhatt0707) October 2, 2023
यापूर्वी एका मुलाखतीमध्ये आरतीने संदीप हा आपला सर्वात मोठा पाठीराखा आहे असं म्हटलं होतं. दोघांनी 2019 साली विवाह केला. "मी या खेळाबद्दलचं माझं प्रेम आणि आवड कायम ठेवत तो खेळत राहिले. लग्नानंतरही त्याने मला कोणतीही गोष्ट बदलण्यास सांगितली नाही. तो मला फार पाठिंबा देतो आणि सहकार्य करतो," असं आरती म्हणाली होती.
9 व्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चीनमधील हांझोउमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळ स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. भारताने 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 60 पदकं जिंकली आहेत. रविवारी म्हणजेच 1 ऑक्टोबरला शॉट पूट (गोळा फेक) स्पर्धेमध्ये तेजिंदर पाल सिंग तूर आणि अविनाश साबळेने 3000 मीटर स्पीपलचेज स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.