टी-20 मध्ये त्रिशतक! एकाची 34 बॉलमध्ये सेंच्युरी तर दुसऱ्याचे 9 बॉलमध्ये 50 रन; मारले 26 Six

Asian Games Mens T20I Cricket Match: तुमचा विश्वास बसणार नाही पण हा सामना प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तब्बल 273 धावांनी जिंकला असून हा सुद्धा एक विक्रमच आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 27, 2023, 10:34 AM IST
टी-20 मध्ये त्रिशतक! एकाची 34 बॉलमध्ये सेंच्युरी तर दुसऱ्याचे 9 बॉलमध्ये 50 रन; मारले 26 Six title=
या सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले

Asian Games Mens T20I Cricket Match: आशियाई गेम्सच्या पुरुष क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यामध्ये भारताचा शेजारी असलेल्या नेपाळच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नेपाळच्या संघाने मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये तब्बल 314 धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजेच केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये एकाच डावात 300 धावांचा टप्पा ओलांडणारा नेपाळ हा पहिला देश ठरला आहे. 

34 चेंडूंमध्ये शतक अन् 9 बॉलमध्ये 50

नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने टी-20 च्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. 34 चेंडूंमध्ये कुशलने शतक झळकावलं आहे. याशिवाय दीपेंद्र सिंह ऐरी नावाच्या नेपाळच्या फलंदाजाने टी-20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं असून केवळ 9 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं आहे. दीपेंद्रने आपल्या पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले. दींपेंद्र हा 10 चेंडूंमध्ये 52 धावा करुन नाबाद राहिला. त्याने एकूण 8 षटकार लगावले. षटकारामधूनच त्याने 48 धावा केल्या. उर्वरित 4 धावा त्याने 2 चेंडूंमध्ये केल्या.

युवराजचा विक्रम मोडला

दीपेंद्रने सिंहने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराजने 2007 साली झालेल्या टी-20 च्या पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना केवळ 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले होते. 

26 षटकार, 14 चौकार

नेपाळच्या फलंदाजांनी 314 धावांचा डोंगर उभारताना 26 षटकार, 14 चौकार लगावले. म्हणजेच नेपाळच्या फलंदाजांनी केवळ चौकार, षटकारांच्या माध्यमातून 212 धावा केल्या. कुशल मल्लाने 50 चेंडूंमध्ये 137 धावांची खेळी केली. त्याने 12 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 237 इतका होता. तर दीपेंद्र सिंहने तब्बल 520 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

विरोधक 41 वर ऑलाऊट; त्यापैकी 23 धावा एक्स्ट्रा

नेपाळने दिलेल्या या अवाढव्य धावसंख्येचा पाठलाग करताना मंगोलियाचा संघ अवघ्या 41 धावांमध्ये तंबूत परतला. अवघ्या 13.1 ओव्हरमध्ये 41 धावा करुन मंगोलियाचा संघ तंबूत परतल्याने नेपाळने हा सामना 273 धावांनी जिंकला. मंगोलियाचे 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. मंगोलियाच्या केवळ एका फलंदाजाला दुहेरी घावसंख्या गाठता आली. आश्चर्याची बाब म्हणजे नेपाळच्या गोलंदाजांनी 41 पैकी 23 धावा या अतिरिक्त दिल्या. यामध्ये 2 नो बॉल, 16 वाईड आणि 5 लेग बाईजचा समावेश आहे.