एका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथला आणखी एक झटका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. 

Updated: Mar 29, 2018, 08:42 PM IST
एका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथला आणखी एक झटका title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

स्मिथला आणखी एक झटका

स्टीव्ह स्मिथचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं असलं तरी त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आणखी एक झटका दिला आहे. दोन वर्षांपर्यंत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकणार नाही. त्यामुळे २०१९च्या वर्ल्ड कपसाठी स्मिथची टीममध्ये निवड झाली तरी त्याला कर्णधार होता येणार नाही.

वॉर्नरला कधीच संधी नाही

तर डेव्हिड वॉर्नरला यापुढे कधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता येणार नाही, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे २०१९ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मायकल क्लार्क कमबॅक करणार?

बॉल छेडछाड प्रकरण ताजं असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं क्रिकेटमध्ये पुनरागमन करून ऑस्ट्रेलियाच्या टीमचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मला याबाबत विचारलं तर त्याचा मी नक्की विचार करीन, असं मायकल क्लार्क म्हणाला आहे.

मायकल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं २०१५ सालचा वर्ल्ड कप जिंकला होता.  २०१५ साली ११५ टेस्ट खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या अॅशेसमध्ये क्लार्क निवृत्त झाला होता.

डॅरेन लेहमनचाही राजीनामा

बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमननंही राजीनाम्याची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टनंतर लेहमन प्रशिक्षकपद सोडणार आहेत.

स्मिथ ओक्साबोक्शी रडला

स्टीव्ह स्मिथनं आज पत्रकार परिषद घेऊन बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले.

यावेळी स्मिथला मात्र आपले अश्रू आवरता आले नाही. मला हे दु:ख सलतय. मी मनापासून माफी मागतो. मी क्रिकेटवर प्रेम करतो. माझ्यामुळे ऑस्ट्रेलिया, क्रिकेटचे चाहते आणि इतरांना खूप त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो, चेंडू कुरतडणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक. घडल्याप्रकाराची सर्व जबाबदारी माझी आहे, असे पुढे स्मिथ म्हणाला. दरम्यान, या प्रकरणामुळे आपल्या घरच्यांना कशी मानहानी सहन करावी लागली. आई-वडिलांच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू आल्याचे तो म्हणाला.