ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचे डीआरएसवर प्रश्नचिन्ह

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३१ रननी पराभव झाला.

Updated: Dec 11, 2018, 09:52 PM IST
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचे डीआरएसवर प्रश्नचिन्ह title=

ऍडलेड : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३१ रननी पराभव झाला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं डीआरएसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मॅचमधले काही निर्णय डीआरएसमुळे ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं गेले नाहीत. अंपायर नायजल लाँग यांनी अजिंक्य रहाणेला १७ रनवर कॅच आऊट दिलं होतं. रहाणेनं डीआरएस घेतल्यानंतर तो आऊट नसल्याचं समोर आलं. यामुळे अंपायरला त्याचा निर्णय बदलावा लागला.

याच पद्धतीनं चेतेश्वर पुजारालाही दुसऱ्या इनिंगमध्ये ८ आणि १७ रनच्या स्कोअरवर आऊट देण्यात आलं. पण दोन्ही वेळा डीआरएस घेतल्यानंतर अंपायरनी निर्णय बदलला. पहिल्या वेळी बॅटला बॉल लागला नव्हता तर दुसऱ्यावेळी पुजारा एलबीडब्ल्यू नव्हता.

डीआरएसच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन नाराज झाला आहे. डीआरएस उत्तम प्रणाली नाही. हे निराशाजनक आहे. मला वाटतं हे सगळ्यांसाठीच निराशाजनक आहे. पण आता जे आहे ते आहे, असं वक्तव्य टीम पेननं केल्याचं वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डनं दिलं आहे.

पहिल्या टेस्टमध्ये झालेला पराभव पचवणं टीम पेनला कठीण जातंय. पण शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या झुंजार खेळीमुळे मॅचमध्ये रंगत आणली. या विश्वासानंच ऑस्ट्रलेयिची टीम पर्थ टेस्टसाठी मैदानात उतरेल. शुक्रवार १४ डिसेंबरपासून दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे.

भारताविरुद्धची टेस्ट सीरिज हे मोठं आव्हान आहे. पहिल्यापासूनच जोरदार स्पर्धा होईल, अशी आम्हाला अपेक्षा होतीच. जर तुम्हाला चांगली टीम बनवायची असेल, तर प्रतिस्पर्धी टीमनी हरवणं कठीण झालं पाहिजे. ऍडलेड टेस्टमध्ये आम्ही ते केलं. भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागला, अशी प्रतिक्रिया टीम पेननं दिली आहे. भारतानं जेवढा विचार केला नसेल त्यापेक्षा जास्त मेहनत आम्ही त्याला करायला लावल्याचं पेन म्हणाला.