मीदेखील #METOOची शिकार, कारकिर्द संपवल्याचा ज्वालाचा आरोप

बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनंही आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल ME TOO या मोहिमेअंतर्गत खुलासा केलाय.

Updated: Oct 10, 2018, 05:14 PM IST
मीदेखील #METOOची शिकार, कारकिर्द संपवल्याचा ज्वालाचा आरोप

हैदराबाद : बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनंही आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल ME TOO या मोहिमेअंतर्गत खुलासा केलाय. बॅडमिंटन संघटनांमध्ये अध्यक्ष झाल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्याबरोबर गैरव्यवहार केल्याचं ज्वाला गुट्टानं ट्विटद्वारे सांगितलय. या व्यक्तीमुळे आपली कारकीर्द संपल्याचंही ज्वालानं म्हंटलय. मी मानसिक छळाबाबत बोलत असले तरी तो छळच असल्याचं तिचं म्हणणं आहे.  संबंधित व्यक्ती संघटनेची अध्यक्ष झाल्यावर त्या व्यक्तीनं आपल्याला राष्ट्रीय संघातून बाहेर काढलं. रियो ऑलिम्पिक खेळून आल्यानंतर पुन्हा आपल्याला राष्ट्रीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं. त्यामुळे आपण खेळायचंच थांबवल्याचं ज्वाल गुट्टाचं म्हणणं आहे. 

ज्वाला गुट्टानं याआधी भारतीय बॅडमिंटनचा राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदवरही टीका केली होती. गोपीचंद फक्त सिंगल खेळाडूंवरच लक्ष केंद्रीत करतो आणि डबल्सच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ज्वालानं केला होता. गोपीचंदवर टीका केल्यामुळे मला राष्ट्रीय टीममधून बाहेर काढण्यात आलं. तसंच मला डबल्ससाठी खेळाडू मिळणंही कठीण झालं, असं ज्वाला तेव्हा म्हणाली होती. आता मात्र ज्वालानं गोपीचंदचं नाव ट्विटमध्ये घेतलं नाही.

२००६ ते २०१६ पर्यंत चांगली कामगिरी केल्यानंतरही वारंवार मला टीमच्या बाहेर काढलं गेलं. २००९ मध्ये मी टीममध्ये पुनरागमन केलं तेव्हा मी जागतिक क्रमवारीत ९व्या क्रमांकावर होते, असं ज्वाला म्हणाली होती. पुलेला गोपीचंदनं मात्र ज्वाला गुट्टाच्या या आरोपांवर कधीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती.