मुंबई : एबी डेविलियर्स आणि क्विंटन डी कॉक यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर बंगळूरुने चेन्नईविरुद्ध आयपीएलच्या सामन्यात आठ बाद २०५ धावा केल्या. डेविलियर्सने ३० चेंडूत आठ षटकार आणि दोन चौकारांच्या सहाय्याने ६८ धावा केल्या. डिकॉकने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. यात चार षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. सामन्यातील डेविलियर्स आणि डिकॉक ज्याप्रमाणे फलंदाजी करत ते पाहता बंगळूरुची धावसंख्या २२० पार जाईल असे वाटले होते मात्र अखेरच्या षटकांत तीन विरेट पडल्या त्यामुळे त्यांची धावगती मंदावली.
डेविलियर्स आणि डीकॉक मैदानावर असताना त्यांनी चेन्नईच्या गोलंदाजांवर चांगलेच आक्रमण केले. डिविलियर्सने ठाकूरच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार ठोकले. यातील एक तब्बल १११मीटर लांब गेला. यंदाच्या आयपीएलमधील हा सर्वात लांब षटकार आहे. बॉल स्टेडियमच्या बाहेर निघून गेल्याने अंपायरला नवा बॉल घ्यावा लागला.
बंगळूरुने सुरुवात चांगली केली. डिकॉकने सुरुवातीपासूनच आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. बंगळूरुचा कर्णधार पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कोहली १८ धावा करुन बाद झाला.
बंगळूरुची धावसंख्या १४व्या षटकांत एक बाद १३८ होती. हीच धावसंख्या काही वेळातच चार बाद १४२ झाली. मनदीप सिंगने १७ चेंडूत ३२ तर वॉशिंग्टन सुंदरने चार चेंडूत १३ धावा करताला संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला.