'Time Out'ची आयडिया माझी नव्हती, शाकिब अल हसनचा मोठा खुलासा; म्हणाला 'अंपायरने...'

श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट' झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर टीका होत आहे. त्याने अपील करण खेळभावनेला धरुन नव्हतं अशी टीका चाहते करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 7, 2023, 05:58 PM IST
'Time Out'ची आयडिया माझी नव्हती, शाकिब अल हसनचा मोठा खुलासा; म्हणाला 'अंपायरने...' title=

श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज हा टाइम आऊट होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरोधातील सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला टाइम आऊट घोषित करण्यात आलं. विकेट गेल्यानंतर मॅथ्यूज दोन मिनिटानंतरही पहिल्या चेंडूचा सामना करण्यास तयार नव्हता, यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने अपील केल्यानंतर अम्पायर्सनी त्याला आऊट दिलं. यामुळे अँजेलो मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळता मैदानाबाहेर जावं लागलं. दरम्यान, यानंतर जगभरात चर्चा रंगली असून क्रिकेट चाहते आणि काही तज्ज्ञ हे खेळभावनेला धरुन नाही असं सांगत शाकिबवर टीका करत आहेत. दरम्यान, सामन्यानंतर शाकिबने विकेटसाठी अपील कऱण्याची मूळ आयडिया आपली नव्हती असा खुलासा केला आहे. 

"आमचा एक फिल्डर माझ्याकडे धावात आला आणि म्हणाला की, मी अपील केलं तर त्याला आऊट देतील. अम्पायर्सनी मला तू गांभीर्याने विचारत आहेस का असं विचारलं. मला ते चुकीचं होतं की योग्य याची कल्पना नव्हती. मला मी युद्धात आहे असं वाटत होतं. जे करायची गरज होती ते मी केलं. आज टाइम आऊटची मदत झाली हे मी अमान्य करणार नाही," असं शाकिबने सांगितलं.

शाकिब अल हसनने त्या खेळाडूची ओळख जाहीर केली नाही. पण तो नजमूल शांतो असण्याची शक्यता आहे. कारण हा संपूर्ण घटनाक्रम घडला तेव्हा तो सतत शाकिबशी बोलत होता. 

दरम्यान मॅथ्यूजने बांगलादेशने टाइम आऊटच्या सहाय्याने आऊट करण्याचा घेतलेला निर्णय फारच लज्जास्पद आणि धक्कादायक होता अशी प्रतिक्रिया दिली. टाइम आऊट होणारा मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. दरम्यान या सामन्यात बांगलादेशने तीन गडी राखत श्रीलंकेचा पराभव केला आणि वर्ल्डकपमधील त्यांच्या वाटचालीवर पूर्णविराम लावला.

"मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. माझ्याकडे तयार होण्यासाठी दोन मिनिटं होती. हेल्मेटमध्ये समस्या असल्याने मी थांबलो होतो. पण कॉमन सेन्स वापरलेलाच नाही. शाकिब आणि बांगलादेशचं हे वर्तन लज्जास्पद आहे," असं मॅथ्यूज सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

"त्यांना असे क्रिकेट खेळायचे असेल, तर त्या पातळीवर जा. हे खूप चुकीचे आहे. जर मला उशीर झाला, माझी दोन मिनिटे गेली आणि कायदा म्हणतो की मला दोन मिनिटांत तयार व्हायचे आहे, lj माझ्याकडे अजून पाच सेकंद होती. अकलेचा वापर अजिबात झाला नाही. मी येथे 'मँकाडिंग' करत नाही किंवा मैदानात अडथळा आणत नाही, हे पूर्णपणे लांच्छनास्पद आहे," असं मॅथ्यूज म्हणाला.