मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. ७१ वर्षांमध्ये भारताला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकता आली. याचबरोबर ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंना बोनस जाहीर केला आहे. प्रत्येक मॅचच्या फी एवढा बोनस या खेळाडूंना मिळणार आहे. त्यामुळे मॅच खेळणाऱ्या ११ खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये एका मॅचचे, बाकावर बसलेल्या खेळाडूंना ७.५ लाख रुपये प्रत्येकी एका मॅचचे मिळणार आहेत. म्हणजेच चारही टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंना ६० लाख रुपयांचा बोनस मिळेल.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं याबद्दलचं प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे. यामध्ये बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंचं अभिनंदनही केलं आहे. खेळाडूंसोबतच प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफनाही बोनसची घोषणा करण्यात आली आहे. प्रशिक्षकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे, तर सपोर्ट स्टाफलाही बोनस देण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट अनिर्णित राहिली. यामुळे ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये आणि मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. पर्थमध्ये झालेली दुसरी टेस्ट भारताला गमवावी लागली होती. भारतानं आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये टेस्ट सीरिज जिंकली आहे. पण दक्षिण आफ्रिकेमध्ये मात्र भारताला अजूनही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.