Indian Cricket Team: वेस्ट इंडिजच्या (West Indies) दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडचा (Ireland) दौरा करणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यानंतर भारतीय संघ आयर्लंडसाठी रवाना होईल. भारतीय संघाने गतवर्षी टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या बी टीमने ही मालिका खेळली होती. त्यानंतर आता बीसीसीआय (BCCI) पुन्हा एकदा आयर्लंड दौऱ्यावर भारताची बी टीम पाठवण्याच्या तयारीत आहे.
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 13 ऑगस्ट रोजी संपत होती. त्यानंतर 18 ऑगस्टपासून आयर्लंडचा दौरा सुरु होईल. तसंच याचम महिन्याच्या अखेरीस आशिया कप सुरु होणार आहे. त्यामुळे खेळाडूंकडे फार कमी वेळ आहे.
व्यस्त वेळापत्रक असल्याने बीसीसीआय आयर्लंड दौऱ्यात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ इच्छित आहे. यासह तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. तसंच विश्वचषक (World Cup) खेळणाऱ्या संघात ज्यांना संधी मिळणार हे नक्की आहे, त्या खेळाडूंनाही विश्रांती दिली जाणार आहे. यादरम्यान, खेळाडूंच्या फिटरनेसकडे जास्त लक्ष दिलं जाईल. रोहित आणि विराटसारख्या वरिष्ठ खेळाडूंसह शुभमन गिललाही विश्रांती दिली जाऊ शकते. शुभमन तिन्ही प्रकारात खेळत असल्याने त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
29 वर्षीय हार्दिक पांड्या भारतीय एकदिवसीय संघातील महत्त्वाच्या सदस्यांपैकी आहे. हार्दिक पांड्या संघात असताना योग्य समतोल साधला जातो. यामुळे संघ व्यवस्थापन खेळाडूंवरील वर्कलोड लक्षात घेता, त्याचा फिटनेस कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त दबाव टाकणं टाळत आहे.
बीसीसीायच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय आणि टी-20 सामन्यानंतर हार्दिकच्या स्थितीवर निर्णय अवलंबून असेल. वर्ल्डकप प्राथमिकता असल्याने हार्दिकला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. विश्वचषकात हार्दिक उप-कर्णधार असेल हे विसरता कामा नये".
वेस्ट इंडिज दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका निभावण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघ 18 दिवसांत 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. भारत 27 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान ब्रिजटाउन (बारबाडोस), तारौबा (त्रिनिदाद), जॉर्जटाउन (गुयाना) और फ्लोरिडामध्ये (अमेरिका) वेस्ट इंडिजविरोधात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. यानंतर भारत आयर्लंडमध्ये पाच दिवसांच्या अंतराने तीन टी-20 खेळणार आहे. जर आशिया कपसाठी कोलंबोला रवाना होण्याआधी हार्दिक पांड्या अमेरिकेहून आयर्लंड आणि नंतर भारतात आला तर त्याच्यावर फार वर्कलोड येईल अशी भीती आहे.
जेव्हा वर्कलोडचा विचार केला जातो, तेव्हा प्रशिक्षण सत्रही लक्षात घेतलं जातं. तसंच फलंदाजीची वेळ किंवा गोलंदाजी करताना टाकलेल्या ओव्हर्स यांचाही विचार केला जातो.