BCCI Reject Offer of ICC : भारतीय क्रिकेट बोर्ड सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखलं जातं. जगात एकूण 108 क्रिकेट बोर्ड आहेत. मात्र, या सर्वांमध्ये बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा प्रभाव सर्वाधिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयची एकूण संपत्ती सुमारे 2.25 अब्ज डॉलर म्हणजे 18,700 कोटी रुपये आहे. त्यामुळे आयसीसीच्या निर्णयात बीसीसीआयचा दबदबा दिसून येतो. बीसीसीआयच्या मान्यतेशिवाय आयसीसीचं पान देखील हालत नाही, याचा प्रत्यय अनेकदा आल्याचं दिसून येतंय. अशातच आता पुन्हा एकदा मदतीची गरज असल्याने आयसीसीने बीसीसीआयसमोर हात जोडले आहेत आणि बीसीसीआयस ऑफर दिली होती.
आगामी महिलांचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आयोजनावरून आयसीसीने बीसीसीआयला ऑफर दिली होती. मात्र, बीसीसीआयने ही ऑफर धुडकावून लागल्याचं पहायला मिळतंय. बांगलादेशमध्ये सध्या राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत आयसीसी चिंतेत आहे. अशातच आता मोठा भाऊ म्हणून आयसीसीने बीसीसीआयचे दरवाजे खटखटवले होते. मात्र, सचिव जय शाह यांनी यावर साफ नकार दिला आहे.
महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे यजमानपद बदलल्यास भारत स्पर्धेचं यजमानपद भूषवणार नाही, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक आयोजित करण्यासाठी BCCI शी संपर्क साधला होता, अशी माहिती देखील जय शहा यांनी यावेळेस दिली. पण आम्ही त्यांना स्पष्ट नकार दिल्याचं जय शहा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
सध्या पावसाळा आहे आणि त्यापेक्षा आम्ही पुढच्या वर्षी महिला एकदिवसीय विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार आहोत. मला असे कोणतेही संकेत द्यायचे नाहीत की मला विश्वचषक सतत आयोजित करायचा आहे, असं कारण देखील जय शहा यांनी सांगितलं आहे. जर वर्ल्ड कप बांगलादेशमध्येच आयोजित केले गेला तर टीम इंडिया आपले खेळाडू पाठवणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
आयसीसीकडे पर्याय काय?
आयसीसीला आशियामध्येच वर्ल्ड कप आयोजित करायचा असेल तर आता फक्त दोन पर्याय उपलब्ध आहेत. बीसीसीआयकडून दरवाजे बंद झाले आहेत. पण श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिराती (UAE) यापैकी एकाची निवड करू शकतो. त्यामुळे आता आयसीसी कोणता निर्णय घेणार? असा सवाल विचारला जात आहे.