आयपीएल २०१९ : क्लब महत्त्वाचा का देश खेळाडूंनी ठरवावं- बीसीसीआय

आगामी वर्ल्ड कप लक्षात घेता आयपीएलमध्ये भारतीय टीममधल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Updated: Mar 12, 2019, 05:15 PM IST
आयपीएल २०१९ : क्लब महत्त्वाचा का देश खेळाडूंनी ठरवावं- बीसीसीआय title=

मुंबई : आगामी वर्ल्ड कप लक्षात घेता आयपीएलमध्ये भारतीय टीममधल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण बीसीसीआयनं मात्र या सगळ्यातून आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. आयपीएल महत्त्वाचं का देश हे खेळाडूंनी ठरवावं, असं मत बीसीसीआयनं व्यक्त केलं आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले, 'बीसीसीआय या मुद्द्याकडे बघत आहे. तसंच फ्रेंचायजीसोबत योग्यवेळी टीमच्या वेळापत्रकाबाबत चर्चा होईल. या सगळ्याकडे आमचं लक्ष आहे.'

ऑक्टोबर २०१८ साली वेस्ट इंडिजच्या सीरिजदरम्यान कर्णधार विराट कोहलीने वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून आयपीएलमध्ये खेळाडूंच्या विश्रांतीच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. प्रशासकीय समिती आणि भारतीय टीम प्रशासनाच्या बैठकीतही ऑक्टोबर २०१८ साली या मुद्द्यावर चर्चा झाली होती.

आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, 'या मुद्द्यावर साफ नितीची गरज आहे. एका खेळाडूला पाच-सात कोटी रुपये मिळतात. ते तुमचे मुख्य खेळाडू असतात आणि त्यांच्यावर असलेला शारिरिक तणाव सगळ्यांनाच माहिती असतो. क्लब पहिले का देश ही जबाबदारी घेणं हे त्यांचं कर्तव्य नाही का? जर जास्त शारिरिक ताण असेल तर त्यांनी देशाला प्राथमिकता देणं गरजेचं नाही का?'

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं मात्र वेगळं मत व्यक्त केलं होतं. 'चार ओव्हर बॉलिंग करून तुम्ही थकणार नाही. या चार ओव्हर तुम्हाला सर्वश्रेष्ठ देण्यासाठी मदत करतील. तुम्ही यॉर्कर टाकाल, वेगवेगळ्या प्रकारचे बॉल टाकण्याचा प्रयत्न कराल आणि दबावात खेळाल. बॉलर संपूर्ण आयपीएल खेळू शकतात, पण ते काय खातात? केव्हा झोपतात आणि केव्हा उठतात, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे,' असं धोनी म्हणाला होता.

'खेळाडूला शेपमध्ये येण्यासाठी आयपीएल योग्य मंच आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक तिसऱ्या दिवसानंतर मी साडेतीन तास क्रिकेट खेळतो, यामुळे मला जिममध्ये व्यायाम करण्यासाठी बराच वेळ मिळतो', अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली होती.