नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत लोकसभा निवडणुकीवेळी नवी इनिंग खेळणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार आहे. दिल्लीतल्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ऋषभ पंतची निवडणूक आयोगानं ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. ऋषभ पंतसोबतच टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राचीही ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये हे दोन्ही खेळाडू मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतील. ही माहिती दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी दिली आहे.
ऋषभ पंत आणि मनिका बत्रा रेडियो आणि व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाबाबत जागरुक करतील. मतदार मतदान केंद्रापर्यंत मोठ्या प्रमाणात यावेत, यासाठी निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं आहे.
भारतामध्ये लोकसभा निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीमध्ये ७ टप्प्यांमध्ये होतील. दिल्लीमध्ये १२ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होईल. ऋषभ पंतनं कमी कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावलं आहे. तर २३ वर्षांच्या मनिकाने २०१८ सालच्या कॉमनवेल्थ गेममध्ये महिला सिंगलमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं.
रणबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या निवडणुकीमध्ये झालेलं मतदान ६५.०२ टक्के होतं. यावेळी हा आकडा वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं रणबीर सिंग यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये मतदारांची एकूण संख्या १.३९ कोटी एवढी आहे. यामध्ये ६२,३५,८१४ महिला आणि ७६,६१,०६८ पुरुष आणि ६४७ तृतीयपंथी आहेत.